‘गुजरात मॉडेल’ ही संकल्पना हेच जणू सध्याच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारातील ‘राजकीय चलन’ असल्यासारखे वापरले जात आहे, असे सांगून मात्र आपल्याला या संज्ञेचा अर्थ नेमका सांगता येणार नाही, असे भारताच्या नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मॉन्टेक सिंग अहलुवालिया यांनी येथील कोलंबिया बिझनेस स्कूलच्या परिषदेत स्पष्ट केले.
विकासाचे ‘गुजरात मॉडेल’ हेच समृद्धीचे आणि परकीय भांडवल मिळवून देणारे मॉडेल आहे असा प्रचार लोक करीत आहेत. परंतु, माझ्या मते फक्त गुजरातच नव्हे, तर प्रत्येक राज्याच्या विकासाचे मॉडेल हे परकीय भांडवलावर अवलंबून नाही असे कोणत्याच राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शकतील असे मला वाटत नाही, असेही अहलुवालिया यांनी स्पष्ट केले. हरयाणा, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, बिहार असो की पंजाब सर्वच राज्यांना परकीय भांडवल हवे आहे. त्यामुळे फक्त विकासाच्या मॉडेलचा विचार केला तर अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आपल्याला राज्यातील विकासाला त्या त्या राज्याचे नाव देतील. म्हणजे गुजरात मॉडेल या संज्ञेऐवजी ते हरयाणा मॉडेल, किंवा संबंधित राज्याचे नाव अशी संज्ञा वापरतील, असे त्यांनी सांगितले.
गुजरातचा विकास दर सर्वाधिक आहे का, या प्रश्नावर बोलताना अहलुवालिया म्हणाले की, गुजरातचा विकास दर निश्चितच अधिक आहे, परंतु सर्वाधिक नाही. बिहार राज्याच्या विकासाचा दर सर्वाधिक आहे. ‘एक गोष्ट स्पष्ट करणे आवश्यक आहे ते म्हणजे गुजरात हे राज्य पारंपरिकदृष्टय़ाच उत्तम काम असलेले राज्य आहे. गुजराती लोक हे खूपच उद्यमशील, नावीन्यपूर्ण पद्धतीने काम करणारे लोक असून भारतीय उद्योगात गेल्या अनेक वर्षांपासून आघाडीवर काम करीत आहेत’, असेही अहलुवालिया यांनी आवर्जून नमूद केले.