भाजपत प्रवेश करण्यासाठी मला १ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली, असा गंभीर आरोप पाटीदार समाजाचे नेते नरेंद्र पटेल यांनी केला आहे. १ कोटीपैकी १० लाख रुपये मला अॅडव्हान्स देण्यात आले असे सांगत त्यांनी पत्रकार परिषदेत नोटांचे बंडलच ठेवले. या आरोपांमुळे गुजरातच्या राजकारणात खळबळ उडाली असून भाजपने या आरोपांवर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गुजरातमध्येही फोडाफोडीचे राजकारण सुरु आहे. हार्दिक पटेलच्या ‘पाटीदार अनामत आंदोलन समिती’तील दोन नेत्यांनी शनिवारी रात्री भाजपत प्रवेश केला होता. या पार्श्वभूमीवर रविवारी रात्री आंदोलन समितीतील नेते नरेंद्र पटेल यांनी पत्रकार परिषद घेत गौप्यस्फोट केला. ‘भाजपत प्रवेश करण्यासाठी मला १ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली. यातील १० लाख रुपये अॅडव्हान्स देण्यात आले होते’, असा दावा त्यांनी केला. पुरावा म्हणून त्यांनी अॅडव्हान्समध्ये मिळालेले १० लाख रुपये माध्यमांना दाखवले.

मला पैसे नको, मी पाटीदार समाजासाठी आंदोलन करत असून राजकीय फायद्यासाठी मी आंदोलनात सहभागी झालेलो नाही, असे त्यांनी सांगितले. वरुण पटेल यांनी मला पैशांची ऑफर दिली होती,उर्वरित ९० लाख रुपये मला सोमवारी मिळणार होते. पत्रकार परिषद घेऊन मला भाजपचा पर्दाफाश करायचा होता, म्हणून मी १० लाख रुपये स्वीकारले, असे त्यांनी स्पष्ट केले.  १० लाख रुपये हे भ्रष्टाचारातून कमावलेले असून त्यांनी मला रिझर्व्ह बँकेतील संपूर्ण पैसा दिला असता तरी भाजपत प्रवेश केला नसता, असे त्यांनी म्हटले आहे. या आरोपांमुळे भाजपची कोंडी होण्याची चिन्हे आहेत.

वरुण पटेल यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. पाटीदार समाजाने भाजपला पाठिंबा दिल्याने काँग्रेसने हे षडयंत्र रचले, असे  आरोप वरुण पटेल यांनी केला. शनिवारी वरुण पटेल आणि रेश्मा पटेल यांनी भाजपत प्रवेश केला होता. आमच्या तीन मागण्या होत्या, भाजपने त्या मागण्या पूर्ण केल्याचे पटेल यांनी सांगितले होते.