गुजरातमधील राज्यसभेच्या निवडणुकीत धनशक्तीचा आणि सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करणाऱ्यांचा पराभव झाला अशा शब्दात काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. ‘सत्यमेव जयते’ असेही पटेल यांनी म्हटले आहे.

गुजरातमधील राज्यसभेतील तीन जागांसाठी मंगळवारी निवडणूक झाली. यात अमित शहा, स्मृती इराणी रिंगणात होते. तर तिसऱ्या जागेसाठी भाजपने काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव अहमद पटेल यांच्याविरोधात बलवंतसिंह राजपूत यांना रिंगणात उतरवले. त्यामुळे ही निवडणूक दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची होती. अमित शहा, स्मृती इराणींचा विजय निश्चित असला तरी अहमद पटेल यांची वाट बिकट होती. काँग्रेस आमदारांच्या राजीनामा सत्रामुळे पटेल यांचा पराभव होतो की काय अशी शक्यता होती. मात्र निवडणुकीत पटेल यांनी भाजपला धक्का देत विजय मिळवला. पटेल यांना ४४ मते पडली असून राजपूत यांना फक्त ३८ मतेच मिळाली.

रात्री उशीरा निकाल जाहीर झाल्यानंतर अहमद पटेल यांनी ट्विटरवरुन भाजपवर निशाणा साधला. ‘सत्यमेव जयते’ असे त्यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे. तर सरकारी यंत्रणेचा, बळाचा आणि पैशांचा दुरुपयोग करणाऱ्यांचा पराभव झाला असा चिमटा त्यांनी भाजपला काढला. काँग्रेसच्या प्रत्येक आमदाराचा मी आभारी आहे, भाजपकडून येणारा दबाव आणि प्रतिकूल परिस्थितीतही तुम्ही मला मत दिले असे सांगत पटेल यांनी गुजरातमधील काँग्रेस आमदारांचे पुन्हा एकदा आभार मानले. सूडाचे राजकारण करणाऱ्या भाजपचे पितळ उघडे पडले. राजकीय दहशतवाद पसरवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आता आगामी विधानसभा निवडणुकीत गुजरातमधील जनताच त्यांना धडा शिकवेल असे पटेल यांनी म्हटले आहे.