निवडणूक आयोगाने गुजरात विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर केलेली नसली, तरीही काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार संघर्ष सुरु झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे होम ग्राऊंड असलेल्या गुजरातमध्ये काँग्रेसने भाजपसमोर आव्हान उभे केले आहे. सध्या काँग्रेस आणि भाजपमध्ये सोशल मीडियावर घमासान पाहायला मिळते आहे. २०१४ च्या निवडणुकीत सोशल मीडियावर फारशा सक्रीय नसलेल्या काँग्रेसने गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'विकास वेडा झाला आहे,' असे कॅम्पेन सुरु केले. या माध्यमातून काँग्रेसने भाजपच्या विकासाच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करुन भाजपला लक्ष्य केले. काँग्रेसच्या या टीकास्त्राला भाजपने आता 'मौका मौका'च्या व्हिडिओने प्रत्युत्तर दिले आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील विश्वचषक सामन्यावेळी टीव्हीवर पाहायला मिळणाऱ्या 'मौका मौका' जाहिरातीचा वापर करत भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला आहे. भाजपचे नेते विजय चौथाईवाले यांनी हा व्हिडिओ ट्विट करत काँग्रेसच्या गुजरात निवडणुकांमधील अपयशाची खिल्ली उडवली आहे. भारत-पाकिस्तानचे संघ विश्वचषकात आमनेसामने आल्यावर कायम भारतीय संघच सरस ठरतो. त्यामुळेच पाकिस्तानी संघ कधी जिंकणार आणि आपण फटाके फोडून आनंद केव्हा साजरा करणार?, असा प्रश्न पाकिस्तानच्या चाहत्याला पडलेला असतो, अशी 'मौका मौका'ची जाहिरात आहे. त्यामुळेच या जाहिरातीत पाकिस्तानी क्रिकेट चाहता हातात फटाक्यांचा बॉक्स घेऊन पाकिस्तानच्या विजयाची वाट पाहात असल्याचे बघायला मिळते. त्याचप्रमाणे भाजप नेत्याने ट्विट केलेल्या व्हिडिओमधील व्यक्ती काँग्रेसच्या विजयाची वाट पाहात बसते. मात्र त्याला २००२, २००७, २०१२ मधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव पाहावा लागतो. याशिवाय २०१४ च्या लोकसभेतही अपयशच पाहावे लागते. या व्हिडिओवरुन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही काँग्रेसची खिल्ली उडवली आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसने 'विकास वेडा झाला आहे,' असे कॅम्पेन करत भाजपच्या विकासाच्या दाव्याची पोलखोल सुरु केली होती. यानंतर 'वेड्या विकासची शेवटची दिवाळी' म्हणत काँग्रेसने भाजपवरील हल्ले तीव्र केले. काँग्रेसच्या या अस्त्रांना आता भाजपने 'मौका मौका'चा व्हिडिओ शेअर करुन टीका करण्याचा 'मौका' साधला आहे.