गुजरात काँग्रेस अध्यक्ष अर्जुन मोधवाडिया यांनी नुकत्याच एका निवडणूक प्रचारसभेत मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची थेट प्राण्यांशी केलेल्या तुलनेची राज्य निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी भाजपने तक्रार केल्यानंतर निवडणूक आयोगाने संबंधित भाषणाची सीडी ऐकून त्याची गंभीर दखल घेत मोधवाडिया यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. तसेच या प्रकरणी २४ नोव्हेंबपर्यंत आपले म्हणणे न मांडल्यास कारवाईचा इशारा दिला आहे.
मोधवाडिया यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांबाबत वैयक्तिक पातळीवर हल्ला न करण्यासंदर्भात निवडणूक आचारसंहितेमधील नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आचारसंहितेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई का करू नये, अशा आशयाची नोटीस निवडणूक आयोगाने मोधवाडिया यांना पाठवली आहे. तसेच या प्रकरणी २४ नोव्हेंबपर्यंत आपले म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. तसेच उत्तर न दिल्यास आपल्याला म्हणणे मांडायचे नसल्याचे गृहीत धरून पुढील कारवाई करण्यात येईल, असेही नोटिशीत म्हटले आहे.
नरेंद्र मोदी वारंवार पंतप्रधानांना लक्ष्य करीत असल्याच्या पाश्र्वभूमीवर मोधवाडिया यांनी २  नोव्हेंबर रोजी वडोदरा येथील जाहीर सभेत मोदी यांच्यावर टीका केली होती. तसेच मोदींची तुलना प्राण्यांशी केली होती.