गुजरातमधील सूरत येथील हिऱ्याचे व्यापारी लक्ष्मीदास वेकारिया पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी आपल्या १२५ कामगारांना बोनस म्हणून स्कूटी दिली आहे. त्यांच्या कामावर खूश होऊन लक्ष्मीदास यांनी त्यांना ही खास भेट दिली आहे.

हिरा व्यापारी लक्ष्मीदास वेकारिया यांनी नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमात आपल्या कामगारांना स्कूटी दिल्या आहेत. लक्ष्मीदास वेकारिया यांनी २०१० मध्ये हिऱ्याची कंपनी सुरू केली होती. दरम्यान, आपल्या कामगारांना अशा प्रकारची अनोखी भेट देणारे लक्ष्मीदास हे एकमेव व्यापारी नाहीत. तर येथील हिऱ्याचे व्यापारी सावजी ढोलकिया हेही आपल्या कामगारांना बोनस देतात. ढोलकिया यांनी गेल्या वर्षी हरे कृष्णा एक्स्पोर्ट्स या त्यांच्या कंपनीतील कामगारांना दिवाळी बोनस म्हणून ४०० फ्लॅट आणि १२६० कार भेट दिल्या होत्या. यावर कंपनीने ५१ कोटी रुपये खर्च केले होते. ५६ कामगारांनाही दागिने भेट म्हणून दिले होते. २०१४ मध्ये सावजी ढोलकिया यांनी आपल्या कंपनीतील १३०० कामगारांना कार, घरे आणि दागिने भेट म्हणून दिले होते. कारागीरांना कामगार म्हणून नव्हे तर कुटुंबातील सदस्य समजतो. कामावर खूश होऊन त्यांना बोनस म्हणून कार आणि घरे भेट दिली, असे ढोलकिया यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले होते.

हरे कृष्णा एक्स्पोर्ट्सचे मालक सावजी ढोलकिया यांनी २०१३ मध्ये कर्मचाऱ्यांना ‘तगडा’ बोनस देण्याची पद्धत सुरू केली होती. त्यांनी आपल्या कामगारांना १२६० कार भेट दिल्या होत्या. गुजरातच्या दुधाला गावात राहणाऱ्या सावजी १९७७ मध्ये फक्त १२.५० रुपये सोबत घेऊन अमरेली येथून सूरत येथे आले होते. हिऱ्याच्या कंपनीत ते काम करत होते. महिन्याला त्यांना १६९ रुपये वेतन मिळत होते. ज्या कंपनीत ते काम करत होते, त्याच कंपनीचे ते सध्या मालक आहेत.