पंतप्रधान नरेंद्री मोदींचा गड असलेल्या गुजरातमधील काही आश्चर्यजनक आकडेवारी समोर आली आहे. गुजरातमधील ८० टक्के अभियंते बेरोजगार आहेत. फक्त २० टक्के अभियंत्यांनाच नोकरी मिळते. स्थापत्य अभियंतासारख्या काही शाखांमधील कॅम्पस प्लेसमेंटमध्ये तर हा आकडा ५ टक्क्यांहूनही कमी आहे. ऑल इंडिया ऑफ टेक्निकल एज्युकेशनच्या (एआयसीटीइ) २०१५-१६ च्या आकडेवारीनुसार कॉम्प्युटर सायन्सचे ११,१९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मात्र, त्यापैकी ३,४०७ विद्यार्थ्यांनाच नोकरी मिळाली. अहमदाबाद मिररने दिलेल्या वृत्तानुसार यंदाच्या वर्षी १७,०२८ विद्यार्थी मॅकेनिकल शाखेतून उत्तीर्ण झाले. परंतु, यातील फक्त ४, ५२४ जणांनाच नोकरी मिळाली. तर अॅडमिशन कमिटी फॉर प्रोफेशनल कोर्सेसने (एसीपीसी) २०१६ मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू केली हेाती. यामध्ये ७१ हजार २७ जागा रिकाम्या राहिल्या होत्या.
मागणीपेक्षा अधिक अभियंत्यांचा पुरवठा, शिक्षणाची गुणवत्ता, बाजाराची गरज आणि पाठ्यक्रमात असलेला फरक, यामुळे कॅम्पस प्लेसमेंटमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी मिळत नसल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. ‘अहमदाबाद मिरर’ला एसएएलचे संचालक (कॅम्पस) रूपेश वसानी म्हणाले, जे विद्यार्थी एमबीए आणि एमसीए करत आहेत. त्यांना ६ ते ८ हजार इतके वेतन दिले जाते. वास्तविक अभियंत्यांना यापेक्षा अधिक हवं असतं. इतकंच नव्हे तर काही कंपन्या १० ते १५ हजार रूपयांची नोकरी त्यांना देऊ केल्यानंतरही त्या ठोकरल्या जातात. पूर्वी ज्यांचे विज्ञान चांगले असत तेच अभियांत्रिकी शाखेत येत. कारण त्यावेळी स्पर्धा खूप होती. आता आभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेशासाठी विशेष अशी पद्धत उरलेली नाही.
विनाअनुदानित महाविद्यालयांच्या संघटनेचे गुजरात प्रदेशाध्यक्ष जनक खंडवाला म्हणाले, उद्योग जगतातील आवश्यकतेप्रमाणे अभ्यासक्रम तयार केले पाहिजेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी इंटर्नशिपही केली पाहिजे. गुजरात टेक्नॉलॉजिकल विद्यापीठाचे संचालक राहुल गुज्जर म्हणाले, एआयसीटीने आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये फक्त कॅम्पस प्लेसमेंटचा उल्लेख केला होता. काही विद्यार्थी हे पुढील शिक्षण घेतात तर काहींना नंतर नोकरी लागले. नोकरी आणि प्लेसमेंट या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत, असे ते म्हणाले.