अफगाणिस्तानमधील अमेरिकन विद्यापीठात दहशतवादी हल्ला झाल्याचे वृत्त आहे.  काबूलमधील विद्यापीठात हल्लेखोरांनी प्रचंड गोळीबार करत विद्यार्थी आणि  शिक्षकांना वेटीस धरले आहे. घटनेची माहिती मिळताच सुरक्षा रक्षक घटनास्थळी दाखल झाले आहेत. ज्या ठिकाणी गोळीबार सुरू आहे, त्या ठिकाणाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी विद्यापीठाला घेराव घातला आहे.  एबीपी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, गोळीबार सध्या थांबला असून विद्यापीठामध्ये परदेशी शिक्षकांसह शंभरहून अधिक जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  काबूलमधील दारुल अमन रोडवर असणाऱ्या विद्यापीठात ही घटना घडली. हल्लेखोर विद्यापीठात असून सध्या कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारलेली नाही. या घटनेनंतर विद्यापीठातून बाहेर पडण्यात यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्याने दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला हल्लेखोरांनी गोळीबार केला. त्यानंतर  जोरदार स्फोट करण्यात आला. आत अडकलेल्या विद्यार्थ्यीं ट्विटरच्या माध्यमातून मदतीची याचना करत आहेत.