कॅनडाने आपल्या देशाला असलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या धोक्याचे गणन ‘कमी’वरून ‘मध्यम’पर्यंत वाढवल्याला काही तास उलटत नाहीत तोच कॅनडाच्या पार्लमेंट परिसरात मोठा गोळीबार झाला. रात्री उशिरापर्यंत हा हल्ला कोणी केला याची निश्चित माहिती हाती आलेली नसली तरी त्यात किमान एक सैनिक जखमी झाला आहे. हल्लेखोर पार्लमेंट परिसरातील सरकारी इमारतींच्या दिशेने धावत गेल्याचे अनेकांनी पाहिले. त्यानंतर त्या इमारतींच्या रोखानेही गोळीबाराचा मोठा धमाका ऐकू आल्याचे सांगितले जात आहे. या सर्व परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. दरम्यान, कॅनडाचे पंतप्रधान हार्पर या हल्लास्थळापासून सुखरूप बाहेर पडले आहेत.
कॅनडाच्या पार्लमेंटपासून अगदी जवळ युद्धस्मारक आहे. कॅनडातील वेळेनुसार बुधवारी सकाळी ९.५२ वाजता या युद्धस्मारकात गोळीबाराचे आवाज ऐकू आले. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार ओटावा पोलिसांनी तातडीने हल्लेखोराविरुद्ध शोधमोहीम हाती घेतली असून संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली आहे. मात्र या परिसरात गोळीबाराचे अनेक आवाज ऐकू येत असल्याचे अनेक वृत्तसंस्थांनी म्हटले आहे. कॅनडाच्या एका सैनिकाचा ‘हिट अँड रन’ अपघातात संशयास्पद मृत्यू झाला होता. एका मुस्लिम युवकाने दोन सैनिकांना आपल्या गाडीने धडक दिली होती. त्याला पोलिसांनी नंतर चकमकीतच ठार केले होते. या घटनेनंतर लगेच देशावरील दहशतवादी हल्ल्याचे गणन ‘कमी’वरून ‘मध्यम’वर नेण्यात आले. त्यानंतर लगेच पार्लमेंटवर हल्ला झाला आहे. कॅनडाच्या गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार अल काइदा, इसिस आदी दहशतवादी संघटनांच्या सायबरविश्वातील चर्चेचा रोख पाहून दहशतवादी हल्ल्याचे गणन वाढवण्यात आले आहे. कॅनडातील अथवा बाहेरील एखादी व्यक्ती किंवा संघटना देशात दहशतवादी कृत्य करण्याची इच्छा अथवा क्षमता राखून असल्याचे गुप्तचर संघटनांचे मत असल्याने हे गणन वाढवण्यात आले, असे सूत्रांनी मंगळवारीच सांगितले होते.