दिल्लीवरून गुडगावला येणाऱ्या प्रवाशांना रस्त्यावर पाणी साचल्यामुळे मोठ्या वाहतूक कोंडीला आज सामोरे जावे लागत आहे. राष्ट्रीय महामार्ग ८वर वाहतूक कोंडी झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आवश्यकता नसेल तर नागरिकांनी घरीच थांबण्याचा सल्ला गुडगाव पोलिसांनी दिला आहे. यासंदर्भात गुडगाव पोलिसांनी ट्वीटही केले.
हरियाणा सरकारने शुक्रवारी शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर केली. तर आवश्यकता नसेल तर राष्ट्रीय महामार्ग ८ चा वापर न करण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. सततचा पाऊस आणि पुरामुळे राष्ट्रीय महामार्ग ८ आणि सोहना मार्गावर पाणी साचले, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. या दोन्ही मार्गाचा वापर टाळण्याचा सल्ला पोलिसांकडून देण्यात येत आहे.
गुरूवारी झालेल्या जोरदार पावसामुळे गुडगावमधले अन्य रस्ते पाण्याने भरून वाहत होते. याचा फटका राष्ट्रीय महामार्ग ८ लाही झाला. ही वाहतूक कोंडी एवढी गंभीर आहे की, काल संध्याकाळपासून गाड्या त्याच जागेवर अडकून पडल्या आहेत. यामुळे काहींनी घरी जाण्याऐवजी ऑफीसमध्येच राहणे पसंत केले.
ही वाहतूक कोंडी एवढी मोठी आहे की शुक्रवार दुपारपर्यंत तरी कमी होईल अशी चिन्हे दिसत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
दिल्ली- जयपुरलाही याचा फटका
राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडीचा फटका दिल्ली- जयपुर मार्गालाही बसला. महाराष्ट्र आणि राजस्थानकडे जाणारी वाहतूकही गुरूवारपासून संथ गतीने चालत आहे.