केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांनी ट्विटरवर एका जवानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. देशाविरोधी घोषणा देण्यात आल्यावर दु:ख होते, असे या व्हिडिओमधील जवान म्हणताना दिसतो आहे. रिजीजू यांनी शेअर केलेला व्हिडिओ सर्जिकल स्ट्राइकनंतर चित्रीत करण्यात आला असण्याची शक्यता आहे. देशद्रोही घोषणा दिल्या जातात, त्यावेळी प्रचंड यातना होतात, असे एक जवान रिजीजू यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहे.

‘आम्ही देशाच्या सीमेवर दहशतवाद्यांशी लढतो आणि देशामध्ये नक्षलवाद्यांशी लढतो. देशात राहून भारत मुर्दाबादच्या घोषणा देणारे आणि राष्ट्रध्वज जाळणारे लोक देशाचे खरे शत्रू आहेत,’ असे व्हिडिओतील एक जवान बोलताना दिसतो आहे. ‘अफझल हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है, अशा घोषणा जेव्हा जेएनयूमध्ये दिल्या जातात, अफझल गुरुच्या मृत्यूचे उदात्तीकरण केले जाते, तेव्हा अतिशय वाईट वाटते,’ अशा भावना जवानाने व्यक्त केल्या आहेत.

‘काही लोक देशविरोधी घोषणा देतात, तेव्हा वाईट वाटत नाही. मात्र अशा काही लोकांमागे लाखो नागरिक उभे राहतात, तेव्हा प्रचंड यातना होतात. मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड याकूब मेननला फाशीची शिक्षा होणे चांगले आहे. मात्र जेव्हा अशा दहशतवाद्याच्या अंत्यसंस्काराला लाखो लोक उपस्थित राहतात, तेव्हा वाईट वाटते. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात जवान शहीद होतात, तेव्हा कोणी काहीही बोलत नाही. मात्र ज्यावेळी दहशतवाद्यांना संपवण्यासाठी सर्जिकल स्ट्राइक केला जातो, त्यावेळी लोक आवाज उठवतात,’ अशा शब्दांमध्ये जवानाने त्याच्या मनातील खंत बोलून दाखवली आहे.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा विरोध करणारी दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थी गुरमेहर कौरवर किरण रिजीजू यांनी लष्कराच्या जवानाचे भाषण ट्विट करत भाष्य केले आहे. कारगिल युद्धात वडिल गमावलेल्या गुरमेहरने ‘माझ्या वडिलांना पाकिस्तानने नव्हे, तर युद्धाने मारले,’ अशी भावना व्यक्त केली होती. यावर किरण रिजीजू यांनी ‘गुरमेहरचे विचार कोणीतरी कलुषित करत आहे,’ अशी प्रतिक्रिया दिली होती.