बार असोसिएशनच्या भूमिकेमुळे वकील मिळण्यात अडचणी

गुडगाव येथील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये एका विद्यार्थ्यांचा शाळेच्या बसवाहकाने गळा कापून खून केल्याच्या प्रकरणी सुनावणी सोहना न्यायालयातून दुसरीकडे वर्ग करावी अशी विनंती यातील एक आरोपी असलेल्या रायन समूहाच्या अधिकाऱ्याने केली आहे. तेथील बार असोसिएशनने या संवेदनशील प्रकरणात आपले वकीलपत्र घेण्यास वकिलांना प्रतिबंध केला आहे असे या आरोपीचे म्हणणे आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. अमिताव रॉय तसेच न्या. ए. एम. खानविलकर यांनी याचिकादाराचे वकील के. टी. एस. तुलसी यांनी केलेला युक्तिवाद ऐकून घेतला.

तुलसी यांनी सांगितले, की आमचे अशिलास वकील मिळणे हा मूलभूत अधिकार आहे व तोच हिरावून घेतला जात आहे. रायन समूहाच्या उत्तर विभागाचे प्रमुख फ्रान्सिस थॉमस यांच्या वकिलास न्यायालयाने सांगितले, की यावर १८ सप्टेंबरला सुनावणी केली जाईल.

थॉमस यांना शाळेच्या आवारात मुलाचा खून झाल्याच्या प्रकरणात शुक्रवारी अटक करण्यात आली होती. तुलसी यांनी असा आरोप केला, की सोहन व गुरगाव येथील बार असोसिएशनने आमचे अशिलाचे वकीलपत्र घेण्यास वकि लांना प्रतिबंध केला आहे.

प्रद्युम्न ठाकूर या सात वर्षांच्या मुलाचा गेल्या शुक्रवारी शाळेच्या आवारात खून झाला होता. वकील मिळणे हा कलम २१ अन्वये (व्यक्तिगत स्वातंत्र्य व जगण्याचा अधिकार) मूलभूत अधिकार असून त्यावरच गदा येत आहे, असा युक्तिवाद वकील तुलसी यांनी केला. हरयाणातील सोहना न्यायालयातून हे प्रकरण दुसरीकडे वर्ग करण्याचा सर्वोच्च न्यायालय विचार करील असे त्यांनी सांगितले.

मुलाच्या खूनप्रकरणी प्रद्युम्नचे वडील व इतर दोन महिला वकिलांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी केली होती. वडिलांनी सीबीआय किंवा एसआयटी चौकशीची मागणी केली होती, तर दोन महिला वकिलांनी शाळांमधील लैंगिक छळ व खुनाचे प्रकार थांबवण्यासाठी सुरक्षा नियमांची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्याची मागणी केली होती.