* महिला न्यायाधीशाचा लैंगिक शोषणाचा आरोप
ग्वाल्हेर येथील एका महिला न्यायाधीशाने अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पदाचा राजीनामा देत मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशांविरोधात लैंगिक शोषणाच्या आरोपावरून सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला.
या महिला न्यायाधीशाने आपल्या तक्रारीच्या महिनाभरानंतर आपले मौन सोडत धक्कादायक खुलासे ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना केले आहेत. मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी लैंगिक छळ केला असून, साथ दिली नाही तर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, अशा प्रकारच्या धमक्या देण्यात आल्याचा खुलासा या महिला न्यायाधीशाने केला.
त्या म्हणाल्या की, “तू मला भेटण्यासाठी बंगल्यात एकटी आली नाहीस. तू माझे म्हणणे ऐकले नाही आता माझे न ऐकण्याच्या परिणामांना सामोरे जा. तुझे करिअरच संपवून टाकेन… अशी धमकी माझी बदली करण्यात आल्यानंतर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी दिली होती.” असा खुलासा महिला न्यायाधीशाने केला. तसेच  “या प्रकरणाच्या चौकशीची मागणी ही जिल्हा न्यायाधीशाच्या मार्फत सरन्यायाधीशांकडे जाणे अपेक्षित आहे. परंतु, जिल्हा न्यायाधीश देखील या प्रकरणात सहभागी असल्यामुळे मी थेट मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना भेटण्याचा पाच ते सहा वेळा प्रयत्न केला. पण, त्यांनी भेटण्याची तयारी दर्शवली नाही. जेव्हा एखाद्या राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशच मदतीसाठी तयार नसेल तर मी जायचे कुणाकडे? आपल्या वरिष्ठांनाच आरोपी धरल्यामुळे इतर कोणी सहकाऱयांनीही मला मदत करण्याची तयारी दर्शविली नाही.” असेही या महिला न्यायाधीशाने सांगितले.
आता थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेत प्रकरणाच्या मुक्त चौकशीसाठी दोन मुख्य न्यायाधीश व उच्च न्यायालयाचे एक न्यायाधीश यांची एक समिती नेमावी, अशी विनंती या महिला न्यायाधीशाने केली आहे.