अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एच १बी व्हिसा सुधारणा विधेयकास पाठिंबा असून या विधेयकामुळे एच१बी व्हिसा असलेल्या नोकरदारांच्या वेतनात भरघोस वाढ होण्याचा विश्वास त्यांना वाटत असल्याचे अमेरिकी काँग्रेस प्रतिनिधींनी म्हटले आहे.

काँग्रेस प्रतिनिधी डॅरेल इसा यांनी एच१बी व्हिसा प्रणाली विकसित करण्यासाठी जगभरातील तज्ज्ञांची मदत घेण्यात येत असल्याचे या वेळी स्पष्ट केले. अध्यक्षांचा एच१बी व्हिसा सुधारणा विधेयकास पाठिंबा असून या मुद्दय़ावर आम्हाला सिनेटमध्येही भक्कम पाठिंबा मिळेल, असेही इसा यांनी सांगितले. भारतातील कंपन्या या व्हिसा प्रणालीचा गैरफायदा घेत असल्याचा आरोपही इसा यांनी केला आहे. येथील व्हिसा प्रणालीचा भारतातील कंपन्यांना ७५ टक्के लाभ होत असून त्याचा फटका अमेरिकी अर्थव्यवस्थेला बसत असल्याचा आरोपही त्यांनी केला. एच१बी व्हिसामध्ये काही सुधारणांमुळे भारताची चिंता वाढणे हे मनोरंजक आहे. या विधेयकाचा भारताला लक्ष्य करण्याचा हेतू नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.