रघुराम राजन यांच्या टीकाकारांना सरकारने योग्य वेळेत उत्तर दिले असते तर राजन यांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नरपद सोडले नसते. मुळात त्यांच्यावर टीका होण्यास सुरूवात झाली तेव्हाच सरकारने त्यांची पाठराखण करायला पाहिजे होती. त्यामुळे कदाचित त्यांनी स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेतला नसता, अशी खंत रघुराम राजन यांच्या आई-वडिलांनी व्यक्त केली. राजन यांचे वडील आर. गोविंदराजन आणि आई मैथिली यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत मनातील भावना बोलून दाखविल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राजन यांची ठामपणे पाठराखण केली होती. मात्र, हे सगळे लवकर घडायला पाहिजे होते. माझ्या बोलण्यामुळे लोकांना कदाचित माझा राग येईल. मात्र, वैयक्तिक टीका खूप जिव्हारी लागते. त्यांच्या धोरणांवर आणि कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करणे ठीक आहे. मात्र, एखाद्यावर वैयक्तिक टीका करणे किंवा त्याच्या देशप्रेमावर शंका घेणे, चुकीचे असल्याचे मैथिली यांनी सांगितले. आर. गोविंदराजन हे भारतीय हेरखात्यातून वरिष्ठ अधिकारी म्हणून निवृत्त झाले आहेत. या काळात देशसेवेसाठी त्यांना कौटूंबिक आयुष्यातील अनेक गोष्टींना मुकावे लागले. त्यामुळे राजन यांच्या देशभक्तीवर शंका घेणे आमच्या मनाला अधिक लागल्याचे आर. गोविंदराजन आणि मैथिली यांनी सांगितले.