पाकिस्तान सरकारने जमात-उद- दावाचा म्होरक्या आणि मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिझ सईदच्या नजरकैदेत वाढ केली आहे. हाफिझ सईद त्याच्या घरीच नजरकैदेत राहणार आहे. त्याच्यासोबत त्याच्या चार साथीदारांनाही घरात नजरकैदेत ठेवण्य़ात येणार आहे., पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी कायद्याअंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे आणि त्यासंदर्भात लवकरच अधिसूचना काढण्यात येणार आहे.

३० जानेवारी २०१७ ला हाफिझ सईद आणि त्याच्या साथीदारांना नजर कैदेत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. २० जानेवारीला अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सूत्रं हातात घेतल्यावर जमात उद दावाविरोधात कारवाईन झाल्यास निर्बंधांचा इशारा दिला होता. त्यानंतर पाकिस्तानने हाफिझ सईदवर कारवाईचं नाटक करत त्याला ९० दिवसांच्या नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. रविवारी त्याची नजरकैद संपणार असताना आता त्याच्या आणि त्याच्या प्रमुख साथीदारांच्या नजरकैदेत वाढ करण्यात आली आहे.

जेव्हा जेव्हा जागतिक पातळीवरून दबाव येतो तेव्हा तेव्हा पाकिस्तान हाफिझ सईदवर कारवाईचं नाटक करत तसेच त्याचं व्हिडिओवर चित्रण करत कारवाई झाली असल्याची बतावणी करतो. पण जागतिक दबाव कमी झाल्यावर त्याला त्याच्या कारवाया करण्यासाठी मोकळं सोडलं जातं. आताही त्याची नजरकैद वाढवण्यात येण्याला ‘तत्वत: मंजुरी’ देण्यात आली आहे. त्यासंबंधी अधिसूचना काढण्यात येणार असली तरी प्रत्यक्षात काढली जाईल तेव्हाच या निर्णयामागचा खरेपणा कळू शकेल

‘जमात उद दावा’ ही ‘लष्कर-ए-तैयबा’ या बंदी घातलेल्या संघटनेचंच बदललेलं रूप आहे. भारतविरोधी कारवाया करणं आणि दहशतवादाला प्रोत्साहन देणं याच उद्देशाने काम करत असलेल्या या गटाचं संघटन हाफिझ सईद करतो.