जमात-उद-दवा या संघटनेचा प्रमुख हफिझ सईद हा १६६ लोकांचे बळी घेणाऱ्या २००८ सालच्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात सहभागी नव्हता, असा दावा पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांनी केला आहे.

सईद हा २६/११च्या हल्ल्यामागे होता, असे मला वाटत नाही. पाकिस्तानात आम्ही त्याला दहशतवादी म्हणून संबोधित नाही, असे ७३ वर्षांचे मुशर्रफ म्हणाले.

सईदला पाकिस्तानात नजरकैद करण्यात आल्याच्या संदर्भात मुशर्रफ म्हणाले, की हफिझ सईद हा मुद्दा फक्त भारतातच आहे, संयुक्त राष्ट्रसंघात नाही. ते हक्कानी किंवा शकील आफ्रिदी यांच्याबाबत बोलत असतील, पण सईदबद्दल नाही. फक्त भारतच त्याच्याबद्दल बोलत असतो, असे त्यांनी मुंबई हल्ल्याबद्दल बोलताना सांगितले.

यावर्षी जानेवारीत ६८ वर्षांच्या हफिझ सईदला ९० दिवसांच्या नजरकैदेत ठेवण्यात आले होते. सईद व त्याच्या संघटनांवर कारवाई करण्याचा नव्या ट्रम्प प्रशासनाकडून पाकिस्तानवर प्रचंड दबाव असल्याची चर्चा होती. दहशतवादी कारवायांतील सईदच्या सहभागामुळे अमेरिकेने त्याच्यासाठी १० अब्ज अमेरिकी डॉलर्सचे इनाम जाहीर केले आहे.

जमात-उद-दवा (जेयूडी) ही बंदी घातलेल्या लष्कर-ए-तोयबा (एलईटी) या दहशतवादी संघटनेची आघाडी असून, मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या हल्ल्याशिवाय अनेक दहशतवादी हल्ल्यांसाठी ती जबाबदार आहे. मुंबईवरील हल्ल्याचा सूत्रधार असलेल्या सईदला या हल्ल्यानंतर लगेच नोव्हेंबर २००८ मध्ये नजरकैद करण्यात आले होते, परंतु न्यायालयाने २००९ साली त्याची सुटका केली होती.