जमात उद दवाचा म्होरक्या हाफिज सईद याचा पाकिस्तानमधील पंजाब सरकारने दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत (एटीए) यादीमध्ये समावेश केला आहे. भारताने पाकिस्तानच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.  देशातील दहशतवाद संपविण्याच्या दृष्टीने पाकिस्तानने उचलले पहिले पाऊल अतिशय योग्य दिशेने पडले आहे असे विकास स्वरुप यांनी म्हटले आहे. दहशतवाद संपवण्यासाठी घेतलेल्या या तर्कशुद्ध निर्णयाचे भारत स्वागत करतो असे परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानातील पंजाब सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे या भागातील लोकांना न्याय मिळेल अशी भावना विकास स्वरुप यांनी व्यक्ती केली. याआधी पाकिस्तान सरकारने हाफिज सईदला दहशतवादी मानण्यास नकार दिला होता. आता दहशतवाद विरोधी कायद्यानुसार त्याचे नाव यादीत लिहिले आहे. याचा अर्थ असा की त्याचा दहशतवादाशी संबंध आहे.  हाफिज सईद आणि त्याचा सहयोगी काजी काशिफ या दोघांची नावे एटीएच्या यादीमध्ये चौथ्या परिशिष्टात टाकण्यात आली आहेत. याबरोबरच अब्दुल्ला ओबैद, जफर इकबाल, अब्दुर रहमान, आबिद यांची नावे देखील या यादीमध्ये टाकण्यात आली आहेत. एटीएच्या यादीमध्ये जर एखाद्याच्या नावाचा समावेश झाला तर ती व्यक्ती कुठल्या ना कुठल्या रुपाने दहशतवादाशी संबंधित आहे असा अर्थ काढला जातो. हाफिज सईद आणि त्याच्या साथीदारांना एटीएच्या यादीमध्ये टाकून पंजाब सरकारने ही कबुली दिली.

चौथ्या सूचीतील नियमांचे उल्लंघन केल्यास तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे हाफिज सईदला शिक्षा देण्याच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. या यादीमध्ये ज्यांच्या नावाचा समावेश आहे त्या व्यक्तींना परदेश प्रवासावर निर्बंध लावले जातात, त्यांच्या संपत्तीची चौकशी करण्याचे अधिकार सरकारला प्राप्त होतात. त्यांना वेळोवेळी न्यायालयात हजर राहावे लागते आणि त्याच्यावर सरकारची करडी नजर असते. हाफिज सईदला ९० दिवसांसाठी नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. तसेच यादीमध्ये त्याच्या नावाचा समावेश होण्याआधी त्याच्यावर परदेश प्रवासावर निर्बंध लादण्यात आले आहेत. हाफिज सईदची फलाह-इ-इंसानियत नावाची एक संस्था आहे. या संस्थेमार्फत त्याने कार्यकर्त्यांची मोठी फौज उभी केली आहे. या संस्थेच्या मालकीच्या अनेक रुग्णवाहिका आहेत. त्या माध्यमातून त्याने त्याचे मोठे जाळे निर्माण केले आहे. हाफिज सईदच्या जमात उद दवा या संघटनेवर बंदी आल्यानंतर फलाह-इ-इंसानियत मार्फतच तो त्याच्या कारवाया सुरू ठेवेल असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.