मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदने आपल्या जमात उद दवाचे नामांतर केले आहे. तेहरीक आझादी जम्मू अॅंड काश्मीर असे त्याने आपल्या संघटनेचे नाव ठेवले आहे. पाकिस्तान सरकारने त्याला नजरकैदेत ठेवल्यानंतर आपल्या संघटनेचे नाव बदलून त्याने तेहरीक आझादी जम्मू अॅंड काश्मीर (टीएजीके) असे ठेवले आहे. जमात उद दवाचे जाळे पाकिस्तानमध्ये आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पाकिस्तान सरकारने हाफिज सईदच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे संघटनेची नाव बदलून आपले जाळे अबाधित ठेवण्यासाठी सईद धडपडत असल्याचे दिसत आहे. सईदची एक दुसरी संघटना आहे फलाह ए इंसानियत फाउंडेशन. सईदच्या या संघटनेला पाकिस्तानच्या कानाकोपऱ्यातून निधी येतो.

५ फेब्रुवारी रोजी काश्मीर दिवस आहे. या दिवशी लाहोर आणि पाकिस्तानातील इतर शहरांमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सईदच्या नव्या संघटनेच्या नावाने हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. रविवारी लाहोरमध्ये संध्याकाळच्या नमाज पठणानंतर काश्मीर कॉन्फरन्स आयोजित करण्यात येणार आहे. सईदच्या या नव्या संघटनेच्या माध्यमातून निधी गोळा करण्याची केंद्रे उभारण्यात आली आहेत तसेच रुग्णवाहिकांची सेवा देखील सुरू करण्यात आली आहे. सईदच्या पाठीमागे पाकिस्तान सरकार हात धुवून लागले असे दिसत असले तरी त्याच्या कार्यकर्त्यांची आणि स्वयंसेवकांची संख्या अमाप आहे. नुकताच पंजाबमधील रावी नदीमध्ये नानकाना साहेब बोट बुडाली होती. या बचावकार्यात सईदच्या संघटनेतील स्वयंसेवकांनी भाग घेतला होता. अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

सईदच्या या सर्व संघटनांवर प्रशासनाची करडी नजर असल्याचे पोलिसांनी सांगितले. हाफिज सईद याच्यावर पाकिस्तान सरकारने परदेश प्रवास करण्यास बुधवारी निर्बंध घातले. काही दिवसांपूर्वी त्याला नजरकैदेत ठेवण्यात आले. त्याला तसेच त्याच्या काही साथीदारांवर हे निर्बंध लादण्यात आले आहेत. तसेच, भारताने हाफिज सईद विरोधात ठोस पुरावे सादर करण्याचे आवाहन पाकिस्तानने केले आहे. भारताने हाफिजविरोधात अनेक पुरावे दिले आहेत परंतु पाकिस्तानने त्याच्याविरोधात ठोस पावले उचलली नाहीत. सईदच्या कारवायांचा दाखला देऊन भारत पाकिस्तानची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही पाकिस्तानने म्हटले. हाफिज सईदबरोबर इतर ३७ जणांनाही परदेश प्रवासावर निर्बंध लादण्यात आले आहेत.