उधमपूरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या ताफ्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याचा कट मुंबई हल्ल्याचा सुत्रधार आणि जमात-उद-दवा दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईदच्या मुलाने आखला होता, अशी धक्कादायक माहिती जीवंत पकडण्यात आलेला दहशतवादी मोहम्मद नावेदने राष्ट्रीय सुरक्षा संस्थेच्या(एनआयए) चौकशीदरम्यान दिल्याचे वृत्त इंग्रजी माध्यमांनी दिले आहे. तसेच या आत्मघातकी हल्ल्याचे प्रशिक्षण देखील हाफिजचा मुलगा तल्हा यानेच दिले होते, असेही नावेदने चौकशीदरम्यान सांगितले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि गुप्तचर संस्थांचे अधिकारी यांनी गेल्या १५ दिवसांहून अधिक काळ नावेदची कसून चौकशी केली. यामध्ये महत्त्वपूर्ण माहिती एनआयएला मिळाली. नावेदने लष्कर-ए-तोयबाच्या दक्षिण काश्मीरमधील कमांडर अबू कासीम याचे छायाचित्रही पुरवले आहे. दरम्यान, जम्मू- काश्मीरमध्ये, तसेच उधमपूरमध्ये हल्ले करण्यात लष्कर-ए-तोयबा या संघटनेची काय भूमिका होती, याबाबत नावेद याकूब हा बुधवारी दंडाधिकाऱ्यांसमोर कबुलीजबाब देणार आहे.
नावेदने त्याचा साथीदार मोहम्मद नोमन ऊर्फ मोमीन याच्यासोबत ५ ऑगस्ट रोजी उधमपूरमध्ये बीएसएफच्या ताफ्यावर हल्ला करून दलाच्या दोन कर्मचाऱ्यांना ठार मारले होते. प्रत्युत्तर हल्ल्यात मोमीन मारला गेला, तर नावेदला त्याने अपहरण केलेल्या दोन लोकांनी पकडून दिले होते.