आम आदमी पक्षाने आपले संपूर्ण लक्ष दिल्लीवर केंद्रित केले असले, तरी या पक्षाला महाराष्ट्रातूनच सर्वाधिक निधी मिळाला असल्याचे दिसते आहे. दिल्लीमध्ये येत्या दोन महिन्यांत विधानसभा निवडणूक होणार आहेत. त्यासाठी ‘आप’कडून सध्या निधीची जमवाजमव सुरू आहे. पक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार गेल्या एक महिन्यात मिळालेल्या निधीपैकी जवळपास ५० टक्के निधी हा एकट्या महाराष्ट्रातून आला आहे. त्याचवेळी पक्षाचे प्रमुख कार्यक्षेत्र असलेल्या दिल्लीतून केवळ २८.६६ टक्के इतकाच निधी मिळाला आहे.
१८ नोव्हेंबर ते १७ डिसेंबर या एका महिन्याच्या कालावधीमध्ये ‘आप’ने १.२९ कोटी रुपयांचा निधी जमवला. यापैकी ६३.७५ लाखांचा निधी महाराष्ट्रातून तर ३७ लाखांचा निधी दिल्लीतून गोळा करण्यात आला आहे, अशी माहिती संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
प्रत्येक व्यक्तीकडून मिळालेल्या सरासरी निधीच्या प्रमाणामध्येही महाराष्ट्रच दिल्लीच्या पुढे आहे. महाराष्ट्रातून प्रतिव्यक्ती ८७०९ रुपयांचा निधी मिळाला तर दिल्लीतून हाच आकडा अवघा १४०२ इतकाच आहे.