भारत-चीन यांच्यातील मतभेद दूर झाले पाहिजेत. परस्पर विश्वास वाढीस लागण्यासाठी पंचशील तत्त्वांचा नव्याने अंगीकार करणे यासाठी महत्त्वाचे ठरेल. शांततापूर्ण शेजार कायम राखण्यासाठी १९५४ साली भारत आणि चीन यांनी म्यानमारसह पंचशील तत्त्वांचाच आधार घेतला होता, असे प्रतिपादन देशाचे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी शनिवारी येथे केले.
द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी आपआपसांतील मतभेदांपेक्षा समान हित अधिक महत्त्वाचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. पंचशील तत्त्वांच्या ६०व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या सोहळ्यात अन्सारी बोलत होते. याप्रसंगी चीनचे अध्यक्ष झी जिनपिंग आणि म्यानमारचे अध्यक्ष थिएन सेन हेही सहभागी झाले होते.
आपल्याला आता पुढेच वाटचाल करायची आहे. यासाठी आपल्याला एकत्र येण्यासाठी परस्पर विश्वास निर्माण करावा लागेल. यासाठी पंचशील तत्त्वांमधील क्षमतांचा वापर करून सहकार्य वाढवता येईल. दिवंगत पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी पंचशीलचा पाया रचला. चीनचे तत्कालीन पंतप्रधान चाऊ एन लाय यांनीही त्याला पाठिंबा दिला. म्यानमारनेही नंतर पंचशीलचा अंगीकार केला. अन्सारी हे पाच दिवसांच्या चीन भेटीवर आहेत. ते म्हणाले, भारत आणि चीन यांच्यातील संबंध खूप जुने आहेत. दोन्ही देशांना जुना भौगोलिक इतिहास आहे. विकासाच्या मार्गावर दोन्ही देश वेगवेगळ्या टप्प्यांवर असतीलही परंतु दोघांना एकमेकांपासून बरेच काही शिकता येईल. जागतिक स्तरावर कृतीचा ठसा अधिक ठळक करण्यासाठी नवीन आयाम तयार करावे लागतील. आम्ही एकाच नियतीचे दोन धागे आहोत आणि शेजारी म्हणून जी आव्हाने आणि संधी आमच्यासमोर येतील त्यांचा शोध घेण्यासाठी समान चौकटीतच काम करण्याची तयार ठेवावी लागेल. या प्रयत्नात पंचशील तत्त्वे महत्त्वाची ठरतील. त्यांच्या माध्यमातूनच परस्पर सहकार्य, विकास अनुभवांतील भागीदार आणि आंतरराष्ट्रीय धोक्यांना अधिक प्रभावीरीत्या हाताळू जाऊ शकतील, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.
‘अरुणाचल’वरील चिनी हक्काचा निषेध
चीनच्या नकाशात अरुणाचल प्रदेशचा समावेश करून त्यावर हक्क सांगितला आहे. चीनच्या या नेहमीच्याच आगळिकीचा भारताने तीव्र शब्दांत निषेध केला. एखाद्या देशाचा प्रदेश केवळ नकाशात दाखवून सत्य स्थिती बदलता येत नाही. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे ठाम प्रतिपादन शनिवारी भारताने केले. याबाबत विचारले असता परराष्ट्र प्रवक्त्याने केवळ नकाशे छापून सत्यस्थिती बदलता येत नाही. याउपर अरुणाचल प्रदेश हे भारताचे अविभाज्य अंग आहे आणि भारताने हे अगदी उच्च स्तरावरील नेत्यांना वारंवार सांगण्यात आले आहे आणि उपराष्ट्रपती अन्सारी यांच्या शिष्टमंडळाला ही गोष्ट कळवण्यात आली आहे.