उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्याकडून चिंता व्यक्त

सध्या देशातील विद्यापीठांपुढे संकुचितवादाचे आव्हान आहे. त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य (Freedom of Expression )आणि उदारमतवादी मूल्यांच्या पुनरुज्जीवनाचे स्रोत असलेल्या विद्यापीठांचे स्वातंत्र्य अबाधित राखणे आवश्यक आहे. संकुचितवादामुळे विद्यापीठांमधील वातावरण बिघडत चालले असल्याची चिंता उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी व्यक्त केली आहे. दिल्ली विद्यापीठाच्या रामजस महाविद्यालयात घडलेल्या घटनांच्या पाश्र्वभूमीवर उपराष्ट्रपतींनी व्यक्त केलेले मत महत्त्वपूर्ण आहे.

पंजाब विद्यापीठाच्या (Panjab University)६६व्या दीक्षांत समारंभ सोहळय़ामध्ये उपराष्ट्रपती हमीद अन्सारी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

देशातीत सध्याच्या अविश्वासू काळामध्ये विद्यापीठांना अधिक स्वातंत्र्य देण्याची गरज आहे. सामाजिक गतिशीलता आणि समता यांचा मार्ग मोकळा होण्यासाठी विद्यापीठांना स्वातंत्र्य आणि उदारमतवादी मूल्यांच्या पुनरुज्जीवनाचे स्रोत म्हणून पुढे करण्याची गरज आहे.

मागील काही दिवसांमध्ये घडलेल्या काही घटनांमुळे देशात संम्रभाची स्थिती निर्माण झाली आहे. विद्यापीठामध्ये अशा घटना घडणे चुकीचे आहे. विद्यापीठांच्या स्वातंत्र्याला संकुचितवादाच्या नावाखाली आव्हान देण्यात येत आहे. हे अधिक धोकादायक आहे, असे ते म्हणाले.

आंदोलनाचा अधिकार देशाच्या राज्यघटनेने दिला आहे. तो आपला मूलभूत अधिकार आहे. भारतासारख्या वैविध्यपूर्ण असणाऱ्या देशाला कट्टर सांप्रदायिकता, वैचारिक अथवा धार्मिकतेपासून रोखण्यासाठी याचा वापर होतो, असे ते म्हणाले.

विद्यापीठांनी कायद्याचा वापर करावा

बेकायदेशीर वर्तन अथवा हिंसेसह अन्य कोणत्याही स्थितीमध्ये विद्यापीठाने शांत राहणे योग्य नाही. शिक्षक अथवा विद्यार्थ्यांच्या एखाद्या दृष्टिकोनाचे समर्थन व खंडण करणे योग्य नाही. विद्यापीठाने आपली शैक्षणिक एकनिष्ठता आणि स्वातंत्र्यता कायम राखण्यासाठी कायद्याचा पुरेपूर वापर करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.