रजा प्रवास सवलत योजनेत (एलटीसी) घोटाळा केल्याचा आणि फसवणूक केल्याचा आरोप असलेले जद(यू)चे खासदार अनिल साहनी यांच्यावर कारवाई करण्याची अनुमती राज्यसभेचे सभापती हमीद अन्सारी यांनी गुरुवारी सीबीआयला दिली. राज्यसभेच्या सभापतींनी अनुमती दिल्यानंतर सीबीआयच्या वतीने वरिष्ठ सभागृहातील सदस्यावर कारवाई होणारे ते पहिलेच सदस्य आहेत. साहनी हे बिहारमधील खासदार आहेत.
साहनी यांनी बनावट ई-तिकिटे आणि बोर्डिग पासचा वापर करून २३.७१ लाख रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप सीबीआयने त्यांच्यावर ठेवला आहे. प्रत्यक्षात प्रवास न करताच साहनी यांनी इतरांच्या सहकार्याने महागाई भत्ताही मिळविला, असे म्हटले आहे.