डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी दादर येथील इंदू मिलची जागा १२.५ एकर जागा महाराष्ट्र सरकारकडे हस्तांतरीत करण्याची घोषणा येत्या ६ डिसेंबरपूर्वी केली जाण्याची शक्यता आहे. डॉ. आंबेडकर यांच्या महानिर्वाण दिनापूर्वी, ४ किंवा ५ डिसेंबर रोजी संसदेत प्रस्ताव मांडून ही जागा राज्य सरकारच्या ताब्यात मांडण्याचा ठराव मंजूर केला जाईल, असे आश्वासन केंद्रीय वस्त्रोद्योग व वाणिज्य मंत्री आनंद शर्मा यांनी शुक्रवारी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांना दिले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा मिळावी या संदर्भात नवी दिल्लीतील कृषी भवन येथे शरद पवार, आठवले आणि वस्त्रोद्योग व वाणिज्य मंत्री आनंद शर्मा यांची बैठक झाली. इंदू मिलची जागा राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळासाठी महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारला हस्तांतरीत केली होती. हे हस्तांतर संसदेच्या माध्यमातून करण्यात आले होते. त्यामुळे राज्य शासनाला ही जागा संसदेच्या माध्यमातूनच परत करण्याची प्रक्रिया करावी लागेल, यावर आठवले आणि शर्मा यांच्यात सहमती झाली.
राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाला वडाळा येथे २५ एकर जागा देऊन भरपाई करण्याचा प्रस्तावही या बैठकीत मांडण्यात आल्याचे समजते. पण ही जागा मूळात राज्य सरकारचीच असल्यामुळे ती परत करणेच इष्ट असल्याचा तोडगा काढण्यात आला. आता ४ किंवा ५ डिसेंबर रोजी संसदेत याबाबत प्रस्ताव मांडण्यात येईल. संसदेची मंजुरी घेऊन  हा भूखंड स्मारकासाठी देण्याची कार्यवाही महाराष्ट्र शासनाकडून करण्याची प्रक्रिया सुरू होईल, असे समजते.