धर्मातर केलेल्या हिंदूंना पुन्हा धर्मात प्रवेश देण्याच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘घर वापसी’ या अभियानाचे जोरदार समर्थन सरसंघचालक मोहन भागवत यांनी येथे केले. पूर्वाश्रमीचे हिंदू पुन्हा धर्मात येण्याने कोणाला पोटशूळ उठत असेल तर त्यांनी धर्मातरविरोधी कायद्याला पाठिंबा द्यावा, असे आव्हान भागवत यांनी विरोधकांना दिले. धर्मातरविरोधी कायदा आणावा अशी मागणीही त्यांनी केली.
येथील हिंदू संमेलनात बोलताना सरसंघचालकांनी धर्मातराच्या मुद्दय़ावरून उठलेल्या वादळाबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली. ज्या अल्पसंख्याकांना पुन्हा हिंदू धर्मात येणे पसंत नसेल त्यांनीही हिंदूंना धर्मातरित करू नये असे आवाहन भागवतांनी केले. आग्रा येथील धर्मातर प्रकरणावरून संसदेत गोंधळ घालणाऱ्या विरोधकांचाही भागवतांनी समाचार घेतला. ‘तुम्हाला धर्मातर पसंत नसेल तर तुम्ही धर्मातरविरोधी कायद्याला का विरोध करता. तुम्ही त्यास पाठिंबा द्यायला हवा’, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना सुनावले.

भागवत‘धर्म’
*बांगलादेश, पाकिस्तानातील हिंदू तेथील अत्याचार सहन करत आहेत
*देवाने सांगितलेच आहे, १०० अपराध झाल्यानंतर हिंदूंविरोधातील अत्याचार सहन करू नका
*भारतात हिंदू आहेत म्हणून हा देश आहे. येथे हिंदू उरलेच नाहीत तर हा देशच राहणार नाही
*जगाच्या कल्याणासाठी सशक्त हिंदू समाज असणे गरजेचे आहे

आम्ही सशक्त हिंदू समाज निर्माण करत आहोत. आम्ही भूतकाळात जे गमावले ते वर्तमानात कमावण्याचे आमचे प्रयत्न आहेत. या हिंदुशक्ती उदयाचा कोणी धसका घेऊ नये.     
– मोहन भागवत, सरसंघचालक

अमित शहांनीही री ओढली
भाजप हा सक्तीच्या धर्मातराला विरोध करणारा एकमेव राजकीय पक्ष आहे. धर्मातरबंदी कायद्याला धर्मनिरपेक्ष राजकीय पक्षांनी पाठिंबा द्यावा असे मत भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी कोची येथे व्यक्त केले. धर्मातराच्या मुद्दय़ावर अल्पसंख्याकांशी बोलणार आहात का, असे विचारले असता, देशात असा कायदा आणला तर तो मतैक्याने आणला जाईल असे शहा म्हणाले.