लहानसहान कारणे अथवा व्यसनावरून तीन वर्षांत सहाजणांची हत्या व शिरच्छेद करून त्यांचे मृतदेह कडेकोट बंदोबस्त असलेल्या तिहार तुरुंगालगत पुरणाऱ्या चंद्रकांत झा या ४६ वर्षीय निर्घृण मारेकऱ्यास दिल्ली न्यायालयाने मंगळवारी एका हत्येप्रकरणात मृत्युदंड ठोठावला.
पोलिसांनी तीन खुनांबद्दल त्याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले असून त्यातील पहिल्या हत्येप्रकरणी सोमवारीच त्याला आजन्म तुरुंगवास ठोठावला गेला होता. आता दुसऱ्या हत्येप्रकरणात त्याला मृत्युदंडच ठोठावला गेला आहे. अत्यंत थंड डोक्याने हत्या करणारा आणि पोलिसांनाही आव्हान देणारा असा गुन्हेगार हा समाजासाठी अत्यंत घातक आहे, असा शेरा न्या. कामिनी लऊ यांनी मारला आहे. दर पंधरा दिवसांनी मी अशी मृतदेहांची भेट पाठवीन, असे झा याने एका चिठ्ठीत पोलिसांना लिहिले होते, याचीही गंभीर दखल न्यायालयाने घेतली. सोमवारी निकाल ऐकताना शांत असलेला झा मंगळवारी मात्र मृत्युदंड ठोठावल्याचे ऐकताना अत्यंत अस्वस्थ झालेला दिसत होता.
बिहारच्या माधेपुराचा मूळचा रहिवासी असलेला चंद्रकांत दिल्लीत पोट भरण्यासाठी आला होता. आपल्याकडे काम करणाऱ्या मजुराला तो व्यसनीपणावरून, खोटे बोलल्यावरून किंवा उद्धटपणावरून मारून टाकत असे. ज्याची हत्या करायची त्याचे हात-पाय तो बांधत असे. त्यानंतर त्याला ठार करून त्याचा शिरच्छेद करीत असे.