संसद हल्ल्याचा दोषी दहशतवादी अफजल सुरू याला फाशीची शिक्षा देणे चूकीचे असल्याचे मत व्यक्त करून काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. दोन वर्षांपूर्वी अफजल गुरूला दिलेल्या फाशीच्या शिक्षेबद्दल शशी थरूर आपल्या ट्विटर अकाऊंटवर म्हणतात की, “अफजल गुरूला दिलेली फाशीची शिक्षा चूकच होती. ते प्रकरण चुकीच्या पद्धतीने हाताळले गेले. अफजल गुरूच्या कुटुंबियांनी त्याला अखेरची भेटण्याची परवानगी मागितली होती. तसेच त्याचे पार्थिव देण्याची कुटुंबियांनी केलेली मागणी पूर्ण करायला हवी होती.”

अफजल गुरूला फाशी देऊन आज दोन वर्षे पूर्ण झाली. केंद्रात काँग्रेस प्रणित यूपीए सरकार असताना अफजल गुरूला फाशी देण्यात आली होती. आता खुद्द काँग्रेस नेते थरूर यांनी अफजल गुरूच्या फाशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून वादाला तोंड फोडले आहे. दरम्यान, अफजल गुरूला फाशी देऊन दोन वर्षे पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर श्रीनगरमध्ये आंदोलनाच्या तयारीत असलेल्या फूटीरतावादी नेत्यांना नजरकैद करण्यात आले होते. तसेच श्रीनगरमधील काही भागांमध्ये संचारबंदी देखील लागू करण्यात आली होती.