काँग्रेस पक्षाची सध्याची अवस्था पाहता केंद्रातील मोदी सरकारचा विरोध करण्यास काँग्रेस पक्ष कमकुवत ठरत आहे, असे मत व्यक्त करून काँग्रेसचे माजी केंद्रीय कायदा मंत्री आणि कर्नाटकचे राज्यपाल राहिलेले हंस राज भारद्वाज यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी पक्षाच्या वस्तुस्थितीशी अनभिज्ञ असल्याचेही ते पुढे म्हणाले. ‘द इंडियन एक्स्प्रे’ला दिलेल्या मुलाखतीत हंसराज भारद्वाज यांनी काँग्रेस पक्षाच्या वाटचाली बद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
सुषमा स्वराज आणि वसुंधरा राजे यांनी राजीनामा न दिल्यास त्याचा परिणाम संसदेच्या कामकाजावर होईल, या काँग्रेस नेत्यांच्या वक्तव्यावर हंसराज यांनी नाराजी व्यक्त केली. संसदेचे कामकाज रोखून धरणे हे शोभनीय नाही. जनतेशी निगडीत महत्त्वाच्या मुदद्यांवर चर्चा करण्यासाठी संसद हा एक सर्वोत्तम मंच आहे. ज्यांनी कायद्याचे उल्लंघन केले आहे. त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई होईलच. काँग्रेस पक्ष ललित मोदी वादाबाबत इतकाच संवदेनशील असेल तर पक्षातील नेत्यांनी आपले कौशल्य दाखवून संसदेत त्यावर चर्चा घडवून आणावी. मात्र, कामकाज ठप्प करण्याची भूमिका घेऊन संसदेत उपस्थित राहण्यात काहीच अर्थ नाही, असे हंस राज म्हणाले.