सियाचेनमधील हिमस्खलनात शहीद झालेले लान्स नाइक हणमंतप्पा कोप्पड यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी धारवाड जिल्ह्यातील कुंदगोळ तालुक्यातील बेटादूर या त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हणमंतप्पा यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी त्यांच्या गावी अलोट जनसागर लोटला होता. हणमंतप्पा अमर रहे..भारत माता की जय..अशा घोषणा देत नागरिकांनी साश्रुनयनांनी शूर वीराला निरोप दिला.  हणमंतप्पांच्या निधनाने संपूर्ण बेटादूर गावावर शोककळा पसरली असून, वीर जवानाच्या अंत्यदर्शनासाठी रीघ लागली होती.
झुंज संपली..
दरम्यान, हणमंतप्पांचे पार्थिव गुरूवारी रात्री हुबळी विमानतळावर दाखल झाले. रात्रभर त्यांचे पार्थिव कर्नाटक इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या इमारतीत ठेवण्यात आले. त्यानंतर सकाळी हणमंतप्पा यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी नेहरू स्टेडियममध्ये ठेवण्यात आले. तेथेही नागरिकांनी जिगरबाज हणमंतप्पांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. तर, गुरूवारी दिल्लीत संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यासह सेनादलांच्या प्रमुखांनी तसेच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी हणमंतप्पांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले होते.