नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपविरुद्ध सपशेल पराभूत झालेल्या काँग्रेसच्या गोटात लोकायुक्तप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे मोदींचा मुखभंग झाल्याचा आनंद व्यक्त करण्यात येत आहे. देशभर भ्रष्टाचाराविरुद्ध रथयात्रा काढणाऱ्या आणि दिल्लीत भ्रष्टाचारावर प्रचंड गोंधळ घालणाऱ्या भाजपने गुजरातमध्ये गेल्या आठ वर्षांपासून लोकायुक्त का नेमला नाही? नेमलेल्या लोकायुक्ताच्या नियुक्तीला आव्हान का दिले? गुजरात सरकारला काय लपवायचे आहे? लोकायुक्तांच्या नियुक्तीने भाजपशासित कर्नाटकात घडले तसे तर गुजरातमध्ये घडणार नाही? असे प्रश्न उपस्थित करून गुजरातमध्ये शक्य तितक्या लवकर लोकायुक्तांनी काम सुरू करावे, अशी अपेक्षा काँग्रेसचे प्रवक्ते रशीद अलवी यांनी व्यक्त केली.  
राज्य मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार काम करण्याचे राज्यपालांवर बंधन आहे, पण त्यामुळे त्यांनी केलेली लोकायुक्तांची नियुक्ती चुकीची ठरविता येणार नाही. कारण हा निर्णय घेताना राज्यपालांनी गुजरात उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीशी विचारविनिमय केला होता, असे सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल देताना म्हटले आहे.
मुख्यमंत्री मोदी यांच्यावर गुजरात उच्च न्यायालयाने ओढलेले ताशेरे मात्र सर्वोच्च न्यायालयाने हटविले आहेत.
भाजपच्या भूमिकेचा विजय
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने भाजपच्या भूमिकेचा विजय झाल्याचा दावा पक्षाचे मुख्य प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाने राज्य मंत्रिमंडळाच्या सर्वोच्चतेचा स्वीकार करणे हाच या निकालातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे. पूर्ण निकाल वाचल्यानंतरच त्यावर विस्तृत प्रतिक्रिया देता येईल. पण हा आपला विजय आहे, असा काँग्रेसने दावा करणे म्हणजे निराशेचे रडगाणे गाण्यासारखे असल्याची टीका प्रसाद यांनी केली.
दिल्लीत भ्रष्टाचारावर प्रचंड गोंधळ घालणाऱ्या भाजपने गुजरातमध्ये गेल्या आठ वर्षांपासून लोकायुक्त का नेमला नाही? नेमलेल्या लोकायुक्ताच्या नियुक्तीला आव्हान का दिले? गुजरात सरकारला काय लपवायचे आहे?
रशीद अल्वी, काँग्रेस प्रवक्ते