न्यायालयीन लढाईत हरीश रावत यांना दिलासा; बंडखोर आमदारांची याचिका फेटाळली

गेल्या दोन महिन्यांतील राजकीय चढउतार आणि सोमवारची न्यायालयीन लढाई हे टप्पे ओलांडून उत्तराखंड विधानसभा मंगळवारच्या शक्तिपरीक्षणासाठी सज्ज झाली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या काटेकोर मार्गदर्शक तत्त्वांनुसार होणाऱ्या या शक्तिपरीक्षणातून, हरीश रावत सरकारवर सभागृहाचा विश्वास आहे की नाही याचा निर्णय होणार आहे. सकाळी १० ते दुपारी १ दोन तासांमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या विशेष सत्रादरम्यान राज्यातील राष्ट्रपती राजवट स्थगित राहणार आहे. विश्वासदर्शक ठरावाच्या संपूर्ण प्रक्रियेचे चित्रीकरण करण्यात येणार असून त्याचा निकाल बंद लिफाप्यात ११ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाला सादर केला जाणार आहे.

त्याआधी, विधानसभा अध्यक्षांनी आपल्याला अपात्र ठरवण्याच्या निर्णयाविरुद्ध उत्तराखंड विधानसभेतील काँग्रेसच्या ९ बंडखोर आमदारांनी केलेली यचिका उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली. या आदेशाविरुद्ध दाद मागणाऱ्या आमदारांना सर्वोच्च न्यायालयानेही दिलासा दिला नाही. परिणामी या आमदारांना मंगळवारच्या विश्वासदर्शक ठरावात सहभागी होता येणार नसल्यामुळे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांचे व पर्यायाने काँग्रेस पक्षाचेही मनोधैर्य वाढले आहे. अध्यक्षांनी अपात्र ठरवलेल्या काँग्रेसच्या ९ आमदारांना विश्वासदर्शक ठरावावरील मतदानात सहभागी होता येणार नसल्यामुळे उत्तराखंड विधानसभेची प्रत्यक्ष क्षमता (इफेक्टिव्ह स्ट्रेंग्थ) ६१ सदस्यांची झाली आहे. यापैकी काँग्रेसकडे स्वत:चे २७ आमदार असून सहा सदस्यांच्या प्रोगेसिव्ह डेमोक्रॅटिक फ्रंटचा (पीडीएफ) पाठिंबा असल्याचा त्यांचा दावा आहे. पीडीएफमध्ये बसपचे २, उत्तराखंड क्रांती दलाचा एक आणि तीन अपक्ष आमदार सहभागी आहेत.

आम्ही आता पीडीएफचा भाग नाही, मात्र तरीही आमचा काँग्रेसला पाठिंबा असल्याचे बसपचे आमदार हरिदास व सरवत करीम अन्सारी यांनी म्हटले आहे. मतदानाबाबतचा अंतिम निर्णय पक्षप्रमुख मायावती घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

प्रमुख विरोधी पक्ष भाजपकडे बंडखोर भीमलाल आर्य यांच्यासह २८ आमदार आहेत. घोडेबाजार दाखवणाऱ्या दोन स्टिंग व्हिडीओजचा काँग्रेसला शक्तिपरीक्षणात फटका बसेल, अशी भाजपला आशा आहे.

आजच्या निकालासाठी मी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो. अलीकडच्या काळात उत्तराखंडने फार अनिश्चितता अनुभवली आहे. आम्ही जिंकलो, तर राज्याचा विकास करण्याचे काम सुरू ठेवू.

– हरीश रावत , माजी मुख्यमंत्री

भाजपने यापासून धडा घेण्याची वेळ आहे. वाटेल ते सरकार आपण पाडू शकत नाही, हे भाजपने शिकायला हवे. आमच्या बंडखोर आमदारांना योग्य ती शिक्षा मिळाली आहे.

– किशोर उपाध्याय, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष