‘डेरा सच्चा सौदा’चा प्रमुख गुरमित राम रहिम सिंगला न्यायालयाच्या आवारातून पळवून नेण्याचा कट रचल्याप्रकरणी हरयाणातील पाच पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पाचही पोलीस कर्मचारी हे बाबा राम रहिमच्या सुरक्षेसाठी तैनात होते.

बाबा राम रहिमला सीबीआयच्या विशेष न्यायालयाने बलात्काराप्रकरणी दोषी ठरवत २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. गेल्या आठवड्यात बाबा राम रहिमला सुनावणीसाठी पंचकुलातील न्यायालयात नेण्यात आले होते. निकालानंतर डेरा सच्चा सौदाचे समर्थक आणि सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी बाबा राम रहिमला न्यायालयाच्या आवारातून पळवून नेण्याचा कट रचला होता अशी धक्कादायक माहिती समोर आली होती. याप्रकरणी अटक झालेले पोलीस कर्मचारी हे उपनिरीक्षक, सहाय्यक उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल आणि हवालदार पदावर कार्यरत आहेत. हे सर्व जण बाबा राम रहिमच्या सुरक्षेसाठी तैनात होते. या सर्वांवर पोलिसांनी देशद्रोह, हत्येचा प्रयत्न आणि अन्य कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या पाच पोलीस कर्मचाऱ्यांना बुधवारीच अटक करण्यात आली होती. त्यांना न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

अटकेच्या कारवाईनंतर गुरुवारी हरयाणाच्या पोलीस महासंचालकांनी संबंधीत पोलिसांचे निलंबन केले. याशिवाय डेरा सच्चा सौदाच्या एका पदाधिकाऱ्यालाही अटक केली आहे. बाबा राम रहिमला पळवून नेण्याच्या कटात त्याचादेखील सहभाग होता.  दरम्यान, बाबा रहिमला शिक्षा सुनावल्यानंतर आता हरयाणा आणि पंजाबमधील तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने राज्यातील पोलीस बंदोबस्त कायम असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. बाबा राम रहिम दोषी ठरल्यानंतर हरयाणा आणि पंजाबमध्ये हिंसाचार उफाळला होता. यात ३८ जणांचा मृत्यू झाला होता. तर २५० हून अधिक जखमी झाले होते.

सात जणांचा कटात सहभाग
न्यायालयाच्या निकालानंतर सात जणांची तिथे तैनात असलेल्या पोलिसांशी बाचाबाची झाली. यानंतर पोलिसांना कटाचा संशय आला आणि पोलीस वेळीच सतर्क झाल्याने बाबा राम रहिमला पळवून नेण्याचा डाव फसला. यानंतर कट रचणाऱ्यांनी इतरांना फोन करुन हिंसाचार घडवण्याच्या सूचना दिल्या.