बारमध्ये जाऊन नायट्रोजन मिश्रीत कॉकटेल प्यायल्याने तरुणाच्या पोटात भोक पडल्याची घटना समोर आल्यानंतर हरयाणा सरकारने शुक्रवारी बारमध्ये नायट्रोजन बंदीचा निर्णय घेतला आहे. यापुढे हरयाणामधील बारमध्ये कॉकटेल, मद्य किंवा खाद्यपदार्थ्यांमध्ये नायट्रोजनचा वापर करता येणार नाही.

दोन महिन्यांपूर्वी ३० वर्षाचा तरुण मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गुरुग्राममधील एका बारमध्ये गेला होता. बारमध्ये त्याने कॉकटेल मागवले. यामध्ये नायट्रोजनचा वापर करण्यात आला होता. द्रवरूपी नायट्रोजनचा धूर गेल्यानंतर कॉकटेल प्यायचे हे त्या तरुणाच्या लक्षात आले नाही आणि धूरासकटच तो कॉकटेल प्यायला. काही वेळाने पोटात दुखू लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. श्वास घेतानाही त्रास होत असल्याने त्याची प्रकृती खालावली. डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत पोटात मोठं भोक पडल्याचे समोर आले होते. या तरुणावर शेवटी शस्त्रक्रिया करण्यात आली असून सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. हे वृत्त प्रसारित होताच हरयाणा सरकारला जाग आली असून शुक्रवारी सरकारने बारमधील कॉकटेल, मद्य आणि खाद्यपदार्थ यामध्ये नायट्रोजनच्या वापरावर बंदी घातली. नायट्रोजनचा वापर अन्नपदार्थ आणि पेय गार करण्यासाठी किंवा गोठवून ठेवण्यासाठी केला जातो.