ज्ञात स्रोतापेक्षा जास्त ३.१८ कोटींची बेहिशेबी मालमत्ता जमवल्याच्या प्रकरणी १९९१ च्या तुकडीतील आयएएस अधिकारी संदीप गर्ग यांना विशेष सीबीआय न्यायालयाने दोषी ठरवले आहे. या अधिकाऱ्यास चार वर्षे सक्तमजुरी व २५ लाख रुपये दंडाची शिक्षा देण्यात आल्याचे सीबीआयच्या प्रवक्तयाने सांगितले.
गर्ग हे भेसळविरोधी विभागाचे संचालक होते. त्यांच्याशिवाय इतर चार जणांनाही दोषी ठरवण्यात आळे आहे. अतुलजिंदाल यांना चार वर्षे सक्तमजुरी व दोन लाख रुपये दंड, सुमन सरीन यांना चार वर्षे सक्तमजुरी व दोन लाख दंड, स्वामीशरण गर्ग यांना दोन वर्षे सक्तमजुरी व दोन लाख दंड तर राजीव गर्ग यांना चार वर्षे सक्तमजुरी व दोन लाख रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
प्रवक्तयाने सांगितले, की गर्ग यांना पानिपत येथे त्यांच्या निवासस्थानी १२ लाख रुपयांची लाच एका उद्योजकाकडून घेताना पकडण्यात आले होते. त्यानंतर सीबीआयने छापा टाकला असता रोकड व कोटय़वधींची मालमत्ता सापडली होती.
या प्रकरणी २८ जुलै २००६ रोजी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल छाला होता. आयएएस अधिकारी गर्ग यांनी ३.३६ कोटी रुपये इतकी बेहिशेबी मालमत्ता १ एप्रिल १९९९ ते १६ एप्रिल २००४ दरम्यान जमवली होती. या अधिकाऱ्याने जानेवारी १९९९ ते एप्रिल २००४ दरम्यान मोठय़ा प्रमाणात मालमत्ता जमवली.