आसाममधील विद्यापीठात प्रक्षोभक भाषण केल्याच्या आरोपावरून तेथील न्यायालयाने भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांच्याविरोधात बजावलेल्या अजामीनपात्र अटक वॉरंटला गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे सुब्रमण्यम स्वामी यांना तूर्त दिलासा मिळाला आहे.
प्रक्षोभक भाषण केल्याच्या आरोपांवरून सुब्रमण्यम स्वामींविरोधात आसाममधील न्यायालयाने अटक वॉरंट बजावताना वापरलेल्या दंडविधान संहितेतील कलमांच्या वैधानिक वापरावर स्वामी यांच्या वकिलांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यावरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारलाही नोटीस बजावली आहे. आसाममधील विद्यापीठात व्याख्यान दिल्यानंतर सुब्रमण्यम स्वामी यांना मानसिक ताणतणावाला सामोरे जावे लागले असल्याचे त्यांचे वकील टी. आर. अंध्यारुजिना यांनी न्यायालयात सांगितले. अजामीनपात्र अटक वॉरंटप्रकरणी सुब्रमण्यम स्वामी यांनी उच्च न्यायालय किंवा इतर सक्षम न्यायालयाकडे जाऊन याचिका दाखल करावी, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायमूर्ती रंजन गोगोई आणि न्या. एम. वाय. इक्बाल यांच्या पीठाने हा निर्णय दिला.