काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांचा शिरच्छेद करणाऱ्या बक्षिस देण्याचे व त्या व्यक्तीचे मंदिर बांधण्याची घोषणा केलेल्या व्यक्तीला काँग्रेस पक्षात प्रवेश दिला आहे. जगतारसिंग बाजवा असे त्या व्यक्तीचे नाव असून उत्तराखंड येथील बाजपूर येथील आहे. याच मतदारसंघातून त्याच्या पत्नीला उमेदवारी देण्याचा काँग्रेसचा विचार असल्याचे वृत्त नवभारत टाइम्स या वेबसाइटने दिले आहे. बाजपूर मतदारसंघातून भाजपच्या वतीने यशपाल आर्य यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
वास्तविक बाजपूर विधानसभा मतदारसंघातून जगतार यांची पत्नी सुनीता या भाजपकडून निवडणूक लढवण्याच्या तयारीत होते. परंतु भाजपने या ठिकाणी यशपाल आर्य यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेल्या जगतार यांनी पत्नी सुनीता व समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

काय म्हणाले होते जगतारसिंग..
हिंसेच्या मार्गावर जाणे माझे काम नाही. पण त्यांच्या (राहुल गांधी) हरकती पाहून भारतीय लोकांचे रक्त गरम होत आहे. अशा देशद्रोहींना भारतात राहण्याचा कोणताच अधिकार नाही. मी युवकांना आवाहन करतो की, जो कोणी राहुल गांधी यांचा शिरच्छेद करून जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर ते टांगेल. त्याचे मी मंदिर बनवून मी रोज पुजा करेन.

दरम्यान निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर करण्याचे प्रमाण वाढले आहे. काही दिवसांपूर्वी पुणे येथील एका गुंडाला भाजपने प्रवेश दिल्याचे प्रकरण गाजले होते. अखेर पक्षाला चूक झाल्याचे मान्य करावे लागले होते. त्यानंतरही काही पक्षांमध्ये गुंडांना प्रवेश देण्याचे सुरूच आहे.