अंदमानातील हॅवलॉक बेटांवर जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे जवळपास ८०० पर्यटक हॅवलॉक बेटांवर अडकले आहेत. बेटावर अडकलेल्या पर्यटकांच्या सुटकेसाठी नौदलाची चार जहाजे अंदमानकडे रवाना झाली आहेत. पाऊस अखंडपणे कोसळत असल्याने स्थानिक प्रशासनाने पर्यटकांच्या सुटकेसाठी नौदलाची मदत मागितली.

अंदमान आणि निकोबारमधील आपत्ती व्यवस्थापन विभागाने पावसामुळे अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अंदमान निकोबारची राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेअरपासून ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या हॅवलोक बेटांना चक्रीवादळाचा फटका बसल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. ‘परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता असल्यानेच नौदलाची मदत मागवण्यात आली आहे,’ अशी माहिती आपत्ती व्यवस्थापनाच्या संचालकांनी आयएएनएस या वृत्तसंस्थेला दिली आहे.

‘जोरदार पाऊस आणि वादळामुळे पर्यटकांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. त्यांना जहाजांपर्यंत पोहोचताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आहे. पर्यटकांना जेट्टीपर्यंत पोहोचण्यात अडथळे येत आहेत. पर्यटकांना हॅवलोक बेटांपासून पोर्ट ब्लेअरपर्यंत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. मात्र या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर वादळामध्ये होईल, असे सध्या तरी म्हटले जाऊ शकत नाही,’ असे आपत्ती व्यवस्थापनाच्या संचालकांनी म्हटले आहे. संध्याकाळपर्यंत पर्यटकांची सुटका होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

एनएस बित्रा, बंगाराम, कुंभीर आणि एलएसयू ३८ ही जहाजे हॅवलोक बेटाकडे जाण्यासाठी निघाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. हॅवलॉक बेट पर्यटनासाठी ओळखले जाते. सुंदर समुद्र किनारे हे हॅवलॉक बेटांचे वैशिष्ट्य आहे.