अमेरिकी वंशाचा लष्कर -ए -तोयबाचा दहशतवादी आणि मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या हल्ल्यातील आरोपी डेव्हिड हेडलीला १७ जानेवारी रोजी शिक्षा सुनाविण्यात येणार आहे. तर हेडलीचा सहकारी तहव्वूर राणाला चार डिसेंबर ऐवजी १५ जानेवारीला शिक्षा सुनाविण्यात येणार आहे.
हेडलीवर मुंबई हल्ल्यातील सहभाग आणि डेन्मार्कमधील वृत्तपत्रावर हल्ला करण्याची योजना आखल्याचे आरोप ठेवण्यात आल्याची माहिती शिकागो न्यायालयाचे प्रवक्ते रॅण्डल सॅमबोर्न यांनी दिली. अमेरिकी प्रमाणवेळेनुसार सकाळी ९.४५ वाजता शिक्षा सुनाविण्याची प्रक्रिया सुरू होईल असे सॅमबोर्न यांनी सांगितले.  हेडलीने मुंबई हल्ल्याची योजना आखली होती, तसेच शहराची रेकी करण्याचे काम केले होते. हेडलीने आपल्या मुंबईतील वास्तव्याच्या दरम्यान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’ परिसराचाही आढावा घेतला होता. मुंबई हल्ल्यातील आरोपी असलेल्या हेडलीचे भारताकडे प्रत्यार्पण केल्यास त्याला फाशीची शिक्षा होण्याची शक्यता होती. ही फाशी टाळण्यासाठीच हेडलीने अमेरिकी गुप्तचर संघटना एफबीआयशी हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला होता.
त्यानुसार १८ मार्च २०१० रोजी त्याने आपल्यावरील सर्व आरोपांची एफबीआयकडे कबुली दिली.