ज्या महिलांना अर्धशिशीबरोबरच अपस्मारी पूर्ववेदनाशी संबंधित काही त्रास असतात त्यांना पुढील काळात ह्रदयविकार व पक्षाघात होण्याची शक्यता अधिक असते, असा दावा भारतीय वंशाच्या संशोधकाने केला आहे.
दोन वेगवेगळ्या अभ्यासात हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. अर्धशिशीबरोबरच जर अपस्मारी पूर्ववेदन (ऑरा) हा विकार असेल तर अशा महिलांना ह्रदयविकाराचा धोका असतो शिवाय त्यांच्या रक्तवाहिन्यांनाही धोका पोहोचतो. ज्या महिला काही विशिष्ट प्रकारची संततीनियामक औषधे वापरतात त्यांनाही काही प्रमाणात रक्तात गाठी होण्याचा धोका असतो.
महिलांच्या आरोग्याच्या अभ्यासात २७,८६० महिलांची निवड करण्यात आली, त्यातील १४३४ महिलांना अर्धशिशीबरोबरच अपस्मार पूर्ववेदनाचा त्रास होता. पंधरा दिवसांच्या अभ्यासात असे दिसून आले की, यातील १०३० महिलांना ह्रदयविकार, पक्षाघात, क्वचितप्रसंगी मृत्यू या परिणामांना सामोरे जावे लागले. उच्च रक्तदाबानंतर अर्धशिशीसह अपस्मार पूर्ववेदन हे हृदयविकाराचे आणखी एक मोठे कारण आहे, असे आयएनएसइआरएम, बोरडक्स येथील फ्रेंच नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ अँड मेडिकल रीसर्च, तसेच बोस्टनच्या ब्रिगहॅम अँड विमेन हॉस्पिटलच्या टोबायस कुर्थ यांनी सांगितले.
कुर्थ यांच्या मते ज्या महिलांना अपस्मार पूर्ववेदनासह अर्धशिशीचा त्रास आहे त्या सर्वानाच ह्रदयविकाराचा झटका येईल किंवा पक्षाघात होईल असे नाही; फक्त त्याची शक्यता जास्त असते असा या संशोधनाचा अर्थ आहे. हा धोका टाळण्यासाठी धूम्रपानापासून दूर राहणे, रक्तदाब कमी ठेवणे, वजन कमी ठेवणे व नियमित व्यायाम हे उपाय आहेत.