पंजाबमधील अमृतसरमध्ये हार्ट ऑफ एशिया परिषदेला सुरूवात झाली आहे. या परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सांयकाळी अमृतसरमध्ये दाखल झाले. त्यानंतर अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी हेही येथे आले. त्यानंतर उभंयतांनी अमृतसरमधील प्रसिद्ध सुवर्ण मंदिरात जाऊन दर्शन घेतले. पाकिस्तानचे सुरक्षा सल्लागार सरताज अजीज हेही नियोजित वेळेआधीच भारतात आले आहेत. सुवर्णमंदिरात पंतप्रधान मोदी व राष्ट्राध्यक्ष घनी यांनी गळाभेट घेतली. उभंयतांनी मंदिराची पाहणीही केली. पंतप्रधान मोदींनी सुवर्णमंदिरातील लंगरमध्ये सेवा केली. त्यांनी भाविकांना जेवण वाढले. या वेळी त्यांच्याबरेाबर केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर, पंजाबचे उपमुख्यमंत्री उपस्थित होते. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष घनी यांनी मंदिराच्या नोंदवहीत आपल्या भावना व्यक्त केल्या. या परिषदेत प्रामुख्याने दहशतवाद, जहालमतवादाविरोधातील उपाय, शिक्षणाच्या क्षेत्रातील सहकार्य वाढवणे यावर चर्चा केली जाणार आहे. या परिषदेत भारत, पाकिस्तान, चीन, इराण, रशिया, सौदी अरेबिया, अझरबैजानसह १४ देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर १७ सहयोगी देशांचे प्रतिनिधीही सामील होतील. एकूण सुमारे ४० देश आणि युरोपीय देशाचे प्रतिनिधीनींही हा परिषद खूप महत्वाचे असल्याचे जाहीर केले आहे. परिषदेत तालिबानी दहशतवाद्यांचा सामना करत असलेले अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनीही सहभागी झाले आहेत. अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित होण्यासाठी महत्वपूर्ण चर्चा होणार आहे. या परिषदेमध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश सहभागी आहेत. पाकिस्तानकडून पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या वतीने सरताज अजीज सहभागी झाले आहेत. दोन्ही देशांमधील सध्याच्या तणावाच्या पार्शवभूमीवर द्विपक्षीय संबंधांमधील कोंडी फुटणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. गेली परिषद पाकिस्तानात झाली होती. त्यावेळी स्वराज आणि अजीज यांच्यामध्ये चर्चा झाली होती.