भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान व्यापारवृद्धीसाठी हवाई कार्गो सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. सध्या पाकिस्तानबरोबर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय ठरण्याची शक्यता आहे.

पाकिस्तान सीमेपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या अमृतसरमध्ये हार्ट ऑफ एशिया ही परिषद होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांच्यात चर्चा झाली. तालिबानी दहशतवाद्यांमुळे अफगाणिस्तानमधील फळ आणि चटई उद्योगावर मोठी संक्रांत आली होती. परंतु भारताशी हवाई मार्गाने मालवाहतुकीचा पर्याय स्वीकारल्यास या क्षेत्राला निश्चितच चालना मिळेल असा आशावाद या बैठकीतून व्यक्त झाला. सध्या अफगाणिस्तानला भारतात माल पाठवायचा असेल तर पाकिस्तानमधील कराची बंदरावरून तो पाठवावा लागत आहे. परंतु पाकिस्तानने त्याला मर्यादा घालून दिल्याने अफगाणिस्तानला नाईलाजाने अत्यंत कमी प्रमाणात भारतात माल पाठवावा लागतो. परंतु भारत-अफगाणिस्तानमध्ये हवाई माल वाहतूक सुरू झाल्यास या अडचणीवर मात करता येईल.

अफगाणिस्तानसाठी भारत एक चांगला व्यापारी मित्र आहे. अफगाणिस्तानातील वस्तूंना भारतात चांगला उठाव आहे. भारताबरोबर हवाई मालवाहतूक सुरू झाल्यास अफगाणिस्तानला फायदा होईल. अफगाणिस्तानमधील फळे, सुक्या मेव्याला भारतात चांगली मागणी आहे. त्याचबरोबर चटई आणि इतर वस्तूंनाही उठाव आहे, अशी माहिती अफगाणिस्तानचे उच्च अधिकारी खालिद पायेंदा यांनी सांगितले.

अफगाणिस्तान आणि भारतातील हवाई माल वाहतुकीच्या मार्गासाठी चाचपणी केली जात आहे. कंदहारमधून फळे थेट भारतात आणण्यासाठी प्रयत्न केला जात आहे, अशी माहिती भारतीय परराष्ट्र विभागाचे अधिकार गोपाल बागले यांनी दिली.

हार्ट ऑफ एशिया परिषदेची सुरूवात दोन नोव्हेंबर २०११ रोजी इस्तंबूल येथून झाली. अफगाणिस्तान मध्यवर्ती ठेवून, विभागातील सहकार्य वाढवण्यासाठी व्यासपीठ तयार करण्याचा हा प्रयत्न या परिषदेच्या माध्यमातून होतो. अफगाणिस्तानात स्थिरता आणतानाच सुरक्षित वातावरणाही तयार करता येईल आणि तेथे समृद्धीही आणता येईल. हा त्यामागील विचार आहे. यासाठी अफगाणिस्तानबरोबरच शेजारील देशांच्या व विभागातील भागीदार देशांच्या सामायिक हितसंबंधांचा आणि आव्हानांचा विचार करण्यात येतो.