उन्हाच्या कडाक्याने तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून कहर केला असून, उष्माघाताने गेल्या काही दिवसांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १११ वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या आठवडाभराच्या काळात कडक उन्हामुळे या दोन्ही राज्यांत कमाल तापमानात वाढ झाली आहे. त्याचा फटका अनेकांना बसतो आहे. तेलंगणामध्ये उष्माघाताने ६६ लोकांचा तर शेजारील आंध्र प्रदेशात ४५ जणांचा बळी गेल्याची माहिती अधिकाऱयांनी दिली.
तेलंगणातील आपत्ती निवारण खात्यातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहबूबनगरमध्ये बळींची संख्या सर्वाधिक आहे. या जिल्ह्यात २८ लोक उष्माघाताने मृत पावले असून, त्या खालोखाल मेडक जिल्ह्यात ११ लोकांचा मृत्यू झाला आहे. हैदराबाद आणि शेजारील रंगा रेड्डी जिल्ह्यामध्ये तुलनेत स्थिती बरी असून, तिथे कोणीही मृत्युमुखी पडलेले नाही.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार तेलंगणामधील एक ते दोन जिल्ह्यांतील कमाल तापमानात गुरुवारी लक्षणीय वाढ झाली आहे. नळगोंडा जिल्ह्यात सर्वाधिक ४१ डिग्री सेल्सियस इतके तापमान नोंदले गेले. आंध्र प्रदेशमधील कडप्पा जिल्ह्यात सर्वाधिक १६ लोक मृत्युमुखी पडले असल्याचे उपमुख्यमंत्री एन. चिन्ना राजप्पा यांनी सांगितले.