देशभरात उष्म्याची तीव्र वाट पसरली असून आंध्र प्रदेश व तेलंगण या दोन्ही राज्यांत गेल्या तीन दिवसांत उष्माघाताच्या २२३ बळींची नोंद झाली आहे. उल्लेखनीय म्हणजे शुक्रवारी एकाच दिवसात १०० बळी गेल्याची नोंद आहे. उत्तर भारत, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, दक्षिण भारत आदी भागांनाही उन्हाच्या तीव्र झळा बसत आहेत.  दरम्यान, दिल्लीतही शनिवारी कमाल तापमान ४४.५ अंश सेल्सियस नोंदविण्यात आल्यामुळे हा दिवस या हंगामातील सगळ्यात गरम ठरला.
आंध्र आणि तेलंगणात उष्म्याची तीव्र लाट असून त्यात आतापर्यंत २२३ जणांचा बळी गेला असल्याची माहिती महसूल सचिव बी. आर. मीणा यांनी दिली. आंध्र प्रदेशात ९५ तर तेलंगणात १२८ जण मृत्युमुखी पडले आहेत. आंध्रच्या प्रकाशम जिल्ह्य़ात ४०, विशाखापट्टणममध्ये १२, तर श्रीकाकुलम जिल्ह्य़ात ८ जण मरण पावले असून तेलंगणाच्या नालगोंडा जिल्ह्य़ात २८, करीमनगरमध्ये २२ आणि खम्मममध्ये ९ लोकांचा मृत्यू ओढवला आहे.
आदिलाबाद, वारंगळ, हैदराबाद, महबूबनगर व निझामाबाद जिल्ह्य़ांच्या अनेक भागांत तीव्र उष्णता होती.तेलंगणातील अदिलाबाद, निझमाबाद, करीमनगर, मेडक, वारंगळ, खम्मम, रंगारेड्डी, हैदराबाद, नळगोंडा, महबूबनगर या जिल्ह्यांत उष्म्याची लाट कायम आहे. आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी, पश्चिम गोदावरी, कृष्णा, गुंटूर, प्रकाशम, नेल्लोर, चित्तूर, कडापा, कुर्नूल येथे तापमान ४५ अंशांच्या पुढे आहे.
ओडिशात २३ बळी
ओडिशात उष्म्याची लाट असून लोकांना घरातच राहण्यास सांगण्यात आले आहे. तेथे शुक्रवारी २३ लोक उष्माघाताने मरण पावले. पश्चिम बंगाल येथे शुक्रवारी उष्माघाताने एक जण मरण पावला. पंजाब व हरयाणातही उष्णतेची लाट आहे व तापमान ४० अंशांच्या पुढे गेले आहे.