उत्तर भारतात उष्म्याची लाट तीव्र असून उत्तर प्रदेशात बांदा येथे बुधवारी सर्वाधिक ४८.२ अंश सेल्सियस एवढे कमाल तापमान नोंदले गेले. कानपूर, लखनऊ, अलाहाबाद या विभागांत तापमानात वाढ नोंदवली गेली. राजधानी दिल्लीतही वातावरण तापलेलेच आहे.
उत्तर प्रदेशात पश्चिम आणि उत्तर भागांत उन्हाच्या काहिलीने लोक हैराण झाले होते. अलाहाबाद, कानपूर, लखनऊ, मेरठसह मोरादाबाद, आग्रा, फैजाबाद, बरेली, झाशी, वाराणसी आदी भागांतही तापमानात वाढ झाली होती.
कानपूरमध्ये वाढता उष्मा आणि विजेच्या भारनियमनामुळे लोकांमध्ये संताप धगधगत होता. व्यापार-व्यवसायावर या भारनियमनाचा विपरीत परिणाम झाल्याने व्यापारी वर्गातही मोठा असंतोष आहे. उत्तर प्रदेशातील या वीजसंकटासाठी भाजपने सत्तारूढ समाजवादी पक्षावर जोरदार टीका केली आहे.
कानपूरचे दोन मंत्री राज्य मंत्रिमंडळात आहेत आणि समाजवादी पक्षाचे पाच आमदारही कानपूरचे आहेत. असे असतानाही येथे १० ते १२ तसांचे भारनियमन लोकांच्या माथी मारले आहे, अशी टीका भाजपने केली आहे.
दिल्लीतही उकाडय़ाने लोक हैराण आहेत. दिल्लीसह देशाच्या काही भागांत गुरुवारी वाळूचे वादळ येईल आणि शुक्रवारी पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यामुळे दोन दिवसांत तापमान सुसह्य़ होण्याची शक्यता आहे. दिल्लीत ३१.२ एवढे किमान तापमान नोंदले गेले. कमाल तापमान ४४ अंशांवर जाण्याची शक्यता आहे.
अभयारण्याची खास तयारी
बिजनौर : उष्म्याच्या लाटेने उत्तर प्रदेशला तडाखा दिला असतानाच अमनगढ व्याघ्र अभयारण्यातील प्राण्यांना पिण्याचे पाणी मुबलक मिळावे म्हणून खास व्यवस्था करण्यात आली आहे. उत्तराखंडच्या जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानालगत असलेल्या या अभयारण्यात वाघांबरोबरच हत्ती आणि विविध प्राण्यांचा मोठा वावर आहे. या अभयारण्यात अनेक तळी असून उन्हाळ्याच्या दृष्टीने नऊ तळी खोदण्यात आली आहेत. पाऊस कमी झाला तर टँकरने ती भरली जाणार आहेत.