काश्मीरच्या अनेक भागांत शनिवारपासून पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून त्यामुळे अनेक घरांची हानी झाली आहे. श्रीनगर-जम्मू महामार्गावर मोठय़ा प्रमाणावर दरडी कोसळल्यामुळे हा महामार्गही बंद ठेवण्यात आला आहे. झेलम नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाटय़ाने वाढ होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे घाबरून जाण्यासारखी परिस्थिती नसून सरकार पूर्ण सज्ज आहे, असे उपमुख्यमंत्री डॉ. निर्मल सिंग यांनी सांगितले. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी यंत्रणा सज्ज असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष दिले जात असल्याची माहिती सिंग यांनी विधिमंडळात दिली.
शनिवारपासून सुरू झालेल्या पावसामुळे चरार-ए-शरीफ भागातील १८ घरांसह ४४ स्थळांची हानी झाली आहे. या भागात प्रामुख्याने दरडी कोसळल्याचा हा परिणाम असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
दरडी कोसळल्यानंतर जम्मू-श्रीनगर महामार्ग दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आला. परंतु पुन्हा मोठा पाऊस पडल्यामुळे महामार्ग दुसऱ्या दिवशीही बंद ठेवण्यात आला. श्रीनगर शहरातील मुन्शीबाग परिसरात झेलम नदीची पातळी धोक्याच्या १८ फूट पातळीपेक्षा चार फूट कमी पातळीवरून वाहत होती. मात्र नंतर नदीची पातळी दोन फुटांनी वाढल्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये घबराट पसरली.
नदीच्या पाण्याची पातळी वाढत असल्यामुळे श्रीनगर शहराच्या लाल चौक या व्यापारी परिसरातील दुकानदारांनी सुरक्षित स्थळी आश्रय घेतला. सांडपाण्याचा निचरा न झाल्यामुळे सखल भागात पाणी शिरून अनेक दुकानांमध्ये पाणीही शिरले. दक्षिण काश्मीरमधील संगमाजवळ ही नदी १४.२५ फूट पातळीवरून वाहत असल्याचे सांगण्यात आले.
बडगाम जिल्ह्य़ातील चोंतीनार भागात पावसामुळे दरडी कोसळून आठ घरे व १० गोठय़ांची हानी झाली. याखेरीज, २६ घरांची अंशत: हानी झाल्याचे सांगण्यात आले.