मुसळधार पावसामुळे महानगरांची दैना; रस्ते जलमय, वाहतुकीचा बोऱ्या मुसळधार पावसामुळे उखडलेले रस्ते, जागोजागी पडलेले खड्डे, त्यांत साचलेले पाणी.. आणि याचा एकत्रित परिणाम म्हणून सर्वत्र झालेली वाहतुकीची कोंडी.. त्यामुळे विस्कळीत झालेले जनजीवन.. हे चित्र केवळ देशाची आर्थिक राजधानी म्हणवून घेणाऱ्या एकटय़ा मुंबईतीलच नाही तर  राजधानी दिल्ली, पाटणा, बंगळुरू आणि हैदराबाद या महानगरांचीही परिस्थिती यापेक्षा वेगळी नव्हती. कच्च्या आणि दीनवाण्या रस्त्यांनी शुक्रवारी या भविष्यातील ‘स्मार्ट सिटीं’ची पार दैना उडाली..

मोसमी पावसाच्या तडाख्याने राजधानी दिल्लीसह गुरगांव, बंगळुरू आणि हैदराबाद या शहरांमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. बंगळुरूमध्ये तर ‘२६ जुलै’सारखी परिस्थिती निर्माण झाली असून तेथील स्थानिक प्रशासनाला आपदग्रस्तांच्या सुटकेसाठी बोटींची व्यवस्था करावी लागली आहे. दिल्लीत तर जागोजागी वाहतूककोंडी झाली होती. तर मेट्रो वाहतुकीवरही पावसाचा परिणाम झाला होता. गुरगांवकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तर दिल्ली- जयपूर महामार्गही त्याला अपवाद ठरला नव्हता. जागोजागी वाहने अडकून पडली होती. दिल्ली आणि हरयाणा सरकारने या मुद्दय़ावरून परस्परांवर दुगाण्या झाडण्याची संधीही यादरम्यान साधून घेतली. रात्री उशिरा वाहतूककोंडी सुटण्यास सुरुवात झाली.

मुंबईत रात्रभर धिंगाणा

मुंबई शहर आणि उपनगरात गुरुवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेली पावसाची संततधार शुक्रवारीही कायम राहिली. त्याचा फटका उपनगरी सेवेला तसेच रस्ते वाहतुकीला बसला. मुंबईतील सखल भागांत पाणी साचल्याने रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली. पूर्व, पश्चिम द्रुतगती महामार्गासह शहरातील अनेक रस्ते जलमय झाल्याने शुक्रवारी दुपापर्यंत वाहने कासवगतीने पुढे सरकत होती. शहरात विविध ठिकाणी सुमारे १८ झाडे कोसळल्याने या गतीलाही ‘ब्रेक’ लागत होता. दुसरीकडे, रुळांवर पाणी साचल्याने उपनगरीय रेल्वेसेवेचा वेगही मंदावला. याचा परिणाम लोकलचे वेळापत्रक कोसळण्यात झाला. महापालिकेने बसविलेल्या पाऊस मोजणी यंत्रांवर दुपारी तीन वाजेपर्यंत शहर विभागात १६.२१ मिलिमीटर पावसाची तर पूर्व आणि पश्चिम उपनगरात अनुक्रमे १५.०६ व २१.१७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पावसाच्या संततधारेमुळे हवेत गारवा निर्माण झाला असून कुलाबा आणि सांताक्रूझ येथे अनुक्रमे २३.६ व २२.४ किमान तापमानाची नोंद झाली.

 

  • दिल्ली

दिल्ली व राष्ट्रीय राजधानी परिसरात (एनसीआर) सखल भागांत अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे दृश्य होते. गुरगांवमध्ये पावसामुळे शाळा-महाविद्यालयांना शुक्रवारी सुट्टी जाहीर करण्यात आली होती.

  • मुंबई

पूर्व, पश्चिम द्रुतगती महामार्गासह शहरातील अनेक रस्ते जलमय झाल्याने शुक्रवारी दुपापर्यंत वाहने कासवगतीने पुढे सरकत होती.

  • बंगळुरू

बंगळुरूला गुरुवारी रात्रीपासून तुफानी पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे शहरात सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील कोदिचिक्कनहळ्ळी आणि बिलेकाहळ्ळी या दोन भागांना जास्त फटका बसला आहे.

  • पाटणा

बिहारमध्ये कोसी या नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून २२ लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. आतापर्यंत २६ जण पूरबळी ठरले आहेत. तर पाटणा शहरात जागोजागी पूरस्थिती निर्माण झाली आहे.

  • हैदराबाद

हैदराबादेतही रस्तोरस्ती पाणी साचल्यामुळे वाहतुकीची गती मंदावली होती. शहरातील टोली चौकी, मेहदीपटनम, बेगमपेठ यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणांवर वाहतूककोंडी झाली होती. नोकरदार, विद्यार्थी, महिला अनेक ठिकाणी अडकून पडले होते. रस्ते जलमय झाल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला होता.