काश्मीरमध्ये सात महिन्यांनंतर पुन्हा अवकाळी पावसाने पुराचा तडाखा दिला असून झेलम नदीची पातळी वाढली आहे. काश्मीर खोऱ्यात १६ लोक अडकून पडले असून बदगाम जिल्ह्य़ात दोन घरे कोसळली आहेत. अधिकाऱ्यांनी राज्यात पूरस्थिती जाहीर केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांना प्रत्यक्ष पाहणीसाठी    काश्मीरला पाठवले आहे. काश्मीरमधील जनतेला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन केंद्राने दिले आहे.
नागरी प्रशासन व पोलीस यांनी झेलम नदीच्या किनारी राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितले आहे. काश्मीरमधील बदगाम जिल्ह्य़ात लादेन खेडय़ात मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. तेथे दोन घरे कोसळली आहेत.
दोन कुटुंबातील सोळाजण आत अडकले असून त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले. झेलम नदीच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडून अनंतनागमधील संगमसह अनेक गावांना तडाखा दिला.
 राममुन्शी भागातही पुराचे पाणी घुसले आहे. बेमिना भागात हमदानिया वसाहतीत पाणी साठले असून तेथे कालवा फुटल्याने ही स्थिती निर्माण झाली.
उपमुख्यमंत्री निर्मल सिंग यांनी विधानसभेत सांगितले की, काश्मीर खोऱ्यातील अनेक नालेही धोक्याच्या पातळीवरून वाहात आहेत. मुख्यमंत्री मुफ्ती महंमद सईद यांच्यासह मंत्र्यांचे एक पथक स्थितीवर लक्ष ठेवून आहे. तीन नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी तात्पुरत्या निवाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली असून २५० कुटुंबांना हलवण्यात आले आहे. चरार ए शरीफ येथे किमान ४० इमारतींचे नुकसान झाले आहे.
 मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भागास भेट दिली असून शालांत परीक्षा दोन दिवस तर शाळेच्या नेहमीच्या परीक्षा चार दिवस लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. श्रीनगर-जम्मू मार्गावर दरडी कोसळल्या असून काश्मीरचा देशाशी संपर्क तुटला आहे.शनिवारी सायंकाळपासून राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस सुरू झाल्यामुळे अनेक भागांचा श्रीनगरशी संपर्क खंडित झाला होता. पावसामुळे दरडी कोसळल्यानंतर जम्मू व श्रीनगरला जोडणारा महामार्गही बंद ठेवण्यात आला. त्यामुळे अनेक ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होऊ शकला नाही. खोळंबलेली वाहतूक सुरू करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते.