हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्य़ाच्या एका खेडय़ात बर्फाचा कडा कोसळून एक महिला व तिच्या मुलासह चार जण ठार झाले. राज्यात जोरदार हिमपात आणि पाऊस यामुळे सामान्य जनजीवन अस्ताव्यस्त झाले.
हिमपात झालेल्या शिमला, मनाली, चंबा आणि पर्वतीय प्रदेश, तसेच किन्नौर व लाहौल-स्पिती या आदिवासी भागात तापमान शून्य अंशांहून कमी झाल्यामुळे सर्वत्र थंडीचे वातावरण कायम राहिले. यामुळे पिके आणि फळबागा यांचे अतोनात नुकसान झाले. चंबा जिल्ह्य़ाच्या पांगी खेडय़ात पर्वतावरून खाली आलेला बर्फाचा कडा कुलू जिल्ह्य़ातील काद्री खेडय़ातील एका घरावर कोसळल्यामुळे एक महिला व तिचे बाळ मरण पावले. आणखी दोघांचा या वातावरणात मृत्यू झाला.
हिमाचल प्रदेशात अभूतपूर्व असा मुसळधार पाऊस पडल्याने १०१ वर्षांचा विक्रम मोडला गेला.   किन्नौरमधील काल्पा येथे ९५ सेंटिमीटरहून अधिक हिमवर्षांवाची नोंद झाली.