भाजप खासदार व अभिनेत्री हेमामालिनी यांच्या वाहनाच्या अपघातप्रकरणी त्यांच्या चालकास अटक करण्यात आली आहे. हेमामालिनी यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. गुरुवारी झालेल्या अपघातात सोनम ही चार वर्षांची मुलगी मरण पावली असून इतर चारजण जखमी झाले आहेत.
हेमामालिनी यांना फॉर्टिस रुग्णालयात दाखल केले असून रमेशचंद ठाकूर हा गाडी चालवत होता. त्याला कोतवाली पोलिसांनी अटक केल्याचे पोलीस अधिकारी दिलीप सिंह यांनी सांगितले. राजस्थानात दौसापासून ६० कि.मी. अंतरावर हा अपघात झाला होता. हेमामालिनी यांच्या कन्या इशा देओल व राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी रुग्णालयात हेमामालिनी यांची भेट घेतली.
त्यांच्या नाकाजवळ व कपाळावर तसेच उजव्या डोळ्याजवळ जखमा झाल्या आहेत, असे फॉर्टिसचे संचालक पी. तांबोळी यांनी सांगितले. दोन्ही वाहने जप्त करण्यात आली आहेत.
हेमामालिनी या मर्सिडीजमध्ये होत्या व त्यांच्या समवेत व्यक्तिगत सहायक व चालक होते. दुसऱ्या मोटारीत पाचजण होते त्यात दोन मुले, दोन महिला व हनुमान महाजन हे होते. हनुमान, त्यांची पत्नी शिखा, सोमिल, सीमा यांना जयपूरच्या सवाई मानसिंग रुग्णालयात हलवले आहे.